धोकादायक इमारतींच्या मालकांना मनपाच्या नोटीसा

जीर्ण वाड्यांचा प्रश्न ऐरणीवर
धोकादायक इमारतींच्या मालकांना मनपाच्या नोटीसा

जुने नाशिक । फारूख पठाण

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाच्या वतीने शहर परिसरातील जुन्या व जीर्ण वाड्यांना नोटीस देऊन सतर्क करण्यात येते, मात्र मागील अनेक वर्षापासून या वाड्या बाबत ठोस असा काहीच निर्णय झालेला नाही. मागील तीन वर्षात जुने नाशिक परिसरातच 25 पेक्षा जास्त लहान-मोठे वाडे कोसळले आहेत तर अजूनही अनेक ठिकाणी जीर्ण अवस्थेत आहेत. महापालिका प्रशासनाने याबाबत कायमचा तोडगा काढावा, अशी मागणी नागरिकांनी केली.

दोन वर्षांपूर्वी गंगाघट परिसरातील प्रभाग क्रमांक 13 मधील नाव दरवाजा भागातील जीर्ण झालेला भालेराव वाडा कोसळला होता. त्यामुळे शेजारी असलेला दीक्षित वाड्यासह आणखी दोन वाड्याची भिंत देखील कोसळली होती. या भागातील काही वाडे जीर्ण झाले असून पाणीदेखील निघत असल्याच्या अनेक तक्रारी आम्ही महापालिका प्रशासनाला त्या वेळी केल्या होत्या तरी महापालिकेने काही दखल घेतली नाही, असा आरोप दीक्षित वाड्यात राहणार्‍या लोकांनी केला आहे.

ऑगस्ट 2019 मध्ये ही दुर्घटना घडली होती. दीक्षित वाड्या समोर दोन दुकाने देखील होती या दुकानांच्या उत्पन्नातून घराचा उदरनिर्वाह चालत होता. यामुळे आवक बंद झाली तर नुकसान मोठे झाले. महापालिकेने नाममात्र पंधरा हजार रुपये नुकसानभरपाई दिली, मात्र अद्यापही त्याबाबत काहीच कारवाई झालेली नाही.2019 च्या पावसाळ्यात जुने नाशिककरांसाठी मोठे संकट आले होते. दोन महिन्यांत सुमारे 25 लहान मोठे जीर्ण व धोकादायक वाडे व काही ठिकाणी भींती कोसळल्या होत्या.

आजही बरेच नागरिक जीर्ण झालेल्या वाड्यांमध्ये वास्तव्य करत आहे. अनेक ठिकाणी मालक आणि भाडेकरी यांच्यातील वादामुळे भाडेकरी वाडे रिकामे करत नसल्याचे समोर आले आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका प्रशासनाने धोकादायक झालेल्या सुमारे 73 वाडे मालकांना किंवा राहणार्‍या लोकांना नोटिसा बजावल्या आहेत. बहुतांश वाड्यांमध्ये नागरिक वास्तव्य करत असल्याची बाब समोर आली आहे. यामुळे त्यांच्या जीवितहानीचा धोका निर्माण झालेला आहे. माती आणि लाकडी बांधकाम असलेले वर्षानुवर्षांचे हे वाडे धोकादायक बनले आहेत.

जीव मुठीत असतो

महापालिका दर पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धोकादायक वाड्यांना नोटिसा देऊन मोकळे होते, मात्र हा प्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी काहीतरी तोडगा निघाला पाहिजे. जे लोकं अशा वाड्यांमध्ये राहतात त्यांच्याशी सल्लामसलत करून महापालिकेने कायमचा तोडगा काढावा. मागच्या वेळेला म्हसरूळ टेक भागात झालेल्या दुर्घटनेत काही लोकांना प्राण गमवावे लागले होते. यामुळे जीव मुठीत घेऊन राहणार्‍यांना महापालिकेने दिलासा द्यावा.

-ईश्वर कदम (सामाजिक कार्यकर्ते)

महापालिकेने आमच्या समस्या सोडवाव्या

शेजारील भालेराव वाड्याच्या पाया सुटलेला होता, व जीर्ण झाला होता. त्यामुळे आम्ही त्यांनाही व महापालिकेला देखील कळवले होते. तरीदेखील वेळीच काही कारवाई झाली नाही. यामुळे त्यांचा वाडा कोसळला व आमचा दीक्षित वाडा देखील कोसळला. यामध्ये आमचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दुकानांमधून जे उत्पन्न मिळायचे ते देखील बंद झाले, महापालिकेने आमच्या समस्यांकडे लक्ष द्यावे, अशी आमची मागणी आहे. -पुष्पवती दीक्षित (घर क्रमांक 2210, दीक्षित वाडा)

जुने नाशिकमध्ये दुर्घटना जास्त

डिंगर अळी परिसर, नाव दरवाजा, पाटील गल्ली, गंगा घाट परिसर, खैरे गल्ली परिसर, मोदकेश्वर लेन, भद्रकाली परिसर, बुधवार पेठ, सुकेनकर लेन, काझीपुरा, कांबळे वाडा परिसर, नाकील वाडा परिसर, काजीगढी भाग आदी ठिकाणी जीर्ण वाडे असून याभागात अनेक वेळा दुर्घटना घडली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com