काळजी घ्या..! गेल्या २४ तासांत करोनाचे २.९५ लाख नवे रुग्ण, दोन हजाराहून अधिक रुग्णांचा मृत्यू

काळजी घ्या..! गेल्या २४ तासांत करोनाचे २.९५ लाख नवे रुग्ण, दोन हजाराहून अधिक रुग्णांचा मृत्यू

एकूण रुग्णसंख्येने तब्बल दीड कोटीचा टप्पा ओलांडला

दिल्ली l Delhi

करोनाच्या दुसऱ्या लाटेने देशाची चिंता वाढवली आहे. दिवसागणिक परिस्थिती ही आणखी गंभीर होताना दिसत आहे. देशभरात रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून एकूण रुग्णसंख्येने तब्बल दीड कोटीचा टप्पा आता पार केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून भारतात दररोज दोन लाखांहून अधिक करोनाच्या नव्या रुग्णांची नोंद होत आहे. एकीकडे दैनंदिन रुग्णसंख्या नवे उच्चांक गाठत असताना मृतांची संख्याही चिंतेचा विषय ठरत आहे. यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडत आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात देशात तब्बल २ लाख ९५ हजार ०४१ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील एकूण रुग्ण संख्या १ कोटी ५६ लाख १६ हजार १३० इतकी झाली आहे.

तसेच गेल्या २४ तासात १ लाख ६७ हजार ४५७ जण उपचारानंतर बरे झाले असून २ हजार ०२३ जणांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत १ कोटी ३२ लाख ७६ हजार ०३९ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.

देशात सक्रिय रुग्नांची संख्या २१ लाख ५७ हजार ५३८ इतकी झाली असून मृतांची संख्या १ लाख ८२ हजार ५५३ इतकी झाली आहे. तसेच देशात आतापर्यंत १३ कोटी ०१ लाख १९ हजार ३१० जणांचं लसीकरण करण्यात आलं आहे.

करोनाचे सर्वाधिक रुग्ण असणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात मंगळवारी ६२ हजार ९७ रुग्णांची नोंद झाली. यानंतर उत्तर प्रदेश (२९ हजार ५७४), दिल्ली (२८ हजार ३९५), कर्नाटक (२१ हजार ७९४)आणि केरळचा (१९ हजार ५७७) समावेश आहे. देशात गेल्या २४ तासांत नोंद झालेल्या रुग्णसंख्येत या पाच राज्यांचा मोठा वाटा आहे. ५४.७२ टक्के रुग्ण या पाच राज्यांमधील आहेत. तसंच २४ तासांत सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्र (५१९) आणि दिल्लीत (२७७) झाले आहेत.

तसेच देशात करोना संक्रमित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना अनेक ठिकाणी राज्य सरकारकडून वेगवेगळे नाईट कर्फ्यू, विकेन्ड लॉकडाऊन यांसारखे निर्बंध घालण्यात आले आहेत. याच दरम्यान कर्नाटकातही नाईट कर्फ्यूची घोषणा करण्यात आलीय.

मंगळवारी जारी करण्यात आलेल्या निर्देशांनुसार, राज्यात २१ एप्रिल ते ४ मे पर्यंत नाईट कर्फ्यू लागू राहील. राज्यात रात्री ९.०० ते सकाळी ६.०० वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू सुरू राहील. तसंच प्रत्येक विकेन्डला (शनिवार - रविवार) संपूर्ण दिवस कर्फ्यू सुरू राहील. या दरम्यान नागरिकांना अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडण्याची परवानगी असेल. रात्री ९ वाजल्यानंतर सर्व मॉल आणि दुकानं बंद राहतील. याशिवाय शिक्षण संस्था, जिम आणि स्पा देखील बंद राहतील. स्विमिंग पूल केवळ ट्रेनिंगसाठी खेळाडूंसाठी उघडले जातील. तसेच राज्य सरकारकडून काही दिवसांपूर्वी देण्यात आलेल्या आदेशानुसार, हरिद्वार कुंभातून परतणाऱ्या भाविकाला सर्वात अगोदर आपली आरटी-पीसीआर टेस्ट करावी लागेल. करोना संक्रमणाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारनं हे आदेश दिले होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com