Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशCoronavirus : देशात गेल्या २४ तासांत रुग्णसंख्येत घट, पण...

Coronavirus : देशात गेल्या २४ तासांत रुग्णसंख्येत घट, पण…

दिल्ली l Delhi

भारतात मागील दोन दिवसांपासून दररोज आढळणाऱ्या नवीन करोना रुग्णांच्या संख्येत थोड्या प्रमाणात घट दिसून येत आहे. त्यामुळे करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं काहीसं चित्र दिसत आहे.

- Advertisement -

दोन दिवसांपूर्वी दररोज वाढणाऱ्या करोना रुग्णांची संख्या चार लाखांच्या पुढे गेली होती. मात्र, गेल्या २४ तासांत यात घट झाल्याचं दिसून आलं. मात्र काळजीची बाब म्हणजे दररोज होणाऱ्या मृत्यू संख्येचा वेग कायम असल्याचं आकेडवारीवरून स्पष्ट झालं आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत आतापर्यंतच्या सर्वाधिक मृत्यूंची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत ३ हजार ४१७ रुग्णांनी आपला जीव गमावला असून हा आतापर्यंतचा उच्चांक आहे.

देशात गेल्या २४ तासांत ३ लाख ६८ हजार १४७ नवे करोना रुग्ण आढळले असून यासोबत देशातील करोना रुग्णसंख्या १ कोटी ९९ लाख २५ हजार ६०४ इतकी झाली आहे. तर दुसरीकडे आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २ लाख १८ हजार ९५९ वर पोहोचली आहे.

दरम्यान देशात गेल्या २४ तासात ३ लाख ७३२ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. या संख्येसह करोनावर मात करणाऱ्यांची संख्या १ कोटी ६२ लाख ९३ हजार ००३ वर पोहचली आहे.

महाराष्ट्रातील स्थिती काय?

रविवारी महाराष्ट्रात एकूण ५६ हजार ६४७ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली तर ६६९ रुग्ण दगावले. शनिवारच्या तुलनेत रविवारी हा आकडा घटल्याचं दिसून आलं आहे. शनिवारी राज्यात ६३ हजार २८२ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. महाराष्ट्रातला रुग्णांचा एकूण आकडा आता ४७.२२ लाखांपर्यंत पोहोचला आहे तर राज्यातला मृत्युदर आता १.४९ टक्के नोंदवण्यात आला. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात राज्यात सर्वाधिक म्हणजे ४,६२१ रुग्णांची नोंद पुण्यात झाली तर ९ रुग्णांचा मृत्यू झाला. तसंच पिंपरी चिंचवडमध्ये ४,१९४ नव्या रुग्णांची नोंद झाली असून ५३ रुग्णांचा मृत्यू झाला.

- Advertisment -

ताज्या बातम्या