लहान मुलांसाठी लस उपलब्ध होणार

केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया
लहान मुलांसाठी लस उपलब्ध होणार

नवी दिल्ली । वृत्तसंस्था New Delhi

करोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी करोनाचे संकट काही टळलेले नाही. तिसर्‍या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक संक्रमण होईल, अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे लहान मुलांबाबत पालकांना चिंता सतावत होती. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया (Union Health Minister Mansukh Mandavia ) यांनी दिलासा देणारी बातमी दिली आहे. ऑगस्ट महिन्यात लहान मुलांसाठीची लस (Vaccines for childrens ) भारतात येईल, अशी माहिती त्यांनी भाजप संसदीय दलाच्या बैठकीत दिली.

सरकार पुढच्या महिन्यापासून लहान मुलांचे लसीकरण सुरू करणार आहे. तसेच भारत जगातील सर्वाधिक लस उत्पादन करणारा देश होत आहे. कारण अनेक कंपन्यांना लस उत्पादनाचा परवाना देण्यात येत आहे, असे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी सांगितले. सध्या भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीची दोन वर्षांवरील मुलांवर चाचणी सुरू आहे. ही चाचणी अंतिम टप्प्यात असून त्याबाबत निकाल पुढच्या महिन्यात येणार आहे.

जायडस कॅडिलाने 12 ते 18 वयोगटातील डीएनए आधारित करोना लसीचे क्लिनिकल ट्रायल नुकतेच पूर्ण केले आहे. लवकरच ही लस देशात उपलब्ध होणार आहे. त्यामुळे परवानगी मिळताच हा पर्याय पालकांसमोर असणार आहे. फायजर-बायोएनटेकच्या लसीही प्रतिक्षेत आहेत. भारताकडून मान्यता मिळाल्यास हा पर्यायही उपलब्ध होणार आहे. मॉडर्ना आणि फायजर भारतात लसीचा पुरवठा करण्यापूर्वी इंडेम्निटी क्लॉज करण्यावर जोर देत आहे.

युरोपमध्ये 12 ते 17 वयोगटातील मुलांना मॉडर्ना लस देण्याची मंजुरी देण्यात आली आहे. या लसीचे दोन डोस असणार आहेत. या लसीचे 3 हजार 732 मुलांवर परीक्षण करण्यात आले आहे. देशात आतापर्यंत 44 कोटींहून अधिक जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. या वर्षाच्या अखेरीस सर्व जणांचे लसीकरण करण्याचे सरकारचें लक्ष्य आहे.

कोव्हॅक्सिनची ट्रायल सुरू

भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनची लहान मुलांवर सध्या ट्रायल सुरू आहे. त्याचा निकाल लवकरच येईल, असे एम्सचे प्रमुख डॉ. गुलेरिया यांनी सांगितले. दोन वर्षांपासूनच्या मुलांना या लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. आता लसीचा दुसरा डोस पुढच्या आठवड्यात देण्यात येणार आहे. दिल्लीच्या एम्समध्ये 6 ते 12 वयोगटातील मुलांना कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस दिला जाणार आहे. त्यानंतर कोव्हॅक्सिनचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com