लोहोणेरमध्ये करोनाबाधिताचा मृत्यू; एक वर्षीय बालकासह सहा रुग्णांचे अहवाल ‘पॉझिटिव्ह’

jalgaon-digital
2 Min Read

लोहोणेर | Lohoner

नाशिक (Nashik) येथे जिल्हा रुग्णालयात करोना सदृश आजारावर उपचार घेत असलेल्या लोहोणेर येथील ७५ वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

यामुळे करोनाचा पहिला बळी लोहोणेर गावात गेला आहे. येथील ७५ वर्षीय शेती व्यवसाय असलेल्या व्यक्तीस कोरोनाची लक्षण जाणवू लागण्याने त्यास नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

उपचार घेत असतानाच आज सकाळी सदर व्यक्तीचे निधन झाले असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. लोहोणेर गावात सध्या करोना सदृश आजाराच्या रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून गेल्या पाच महिन्यात कोणताही रुग्ण नसतांना आज एक वर्षाच्या लहान बालकासह सहा व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

लोहोणेर गावातील एकूण करोनाबाधितांची संख्या ४५ वर जाऊन पोहचली आहे. यामुळे लोहोणेर गावात करोना बाबत भीती व्यक्त केली जात आहे.

एकीकडे करोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत असतांनाही काही महाभाग मात्र कोणतीही काळजी घेत नसून जाणीवपूर्वक विना मास्क बिनधास्तपणे गावात फिरत असतात.

प्रशासनाने यांना आवर घालणे गरजेचे आहे. तर प्रशासनाचे वतीने गेल्या २८ तारखेपासून पाच दिवसासाठी जनता कर्फ्यु जाहीर केल्या नंतरही ठराविक अपवाद वगळता काही दुकानदारानी आपली दुकाने चालू ठेवण्यातच धन्यता मानली.

यामुळे जनता कर्फ्युला काहींनी जाणीव पूर्वक हरताळ फासल्याचे चित्र लोहोणेर गावात पहावयास मिळाले. एकंदरीत करोना बाबत कोणालाही गांभीर्य नसल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.

करोना सदृश आजाराची प्राथमिक लक्षणे जाणवत असल्यास आपल्या नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करून घ्यावी. तोंडाला मास्क लावावे, सॅनिटायझरचा वापर करावा. सामाजिक अंतर पाळावे.

करोना बाबत कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नये आपण आपली व कुटुंबातील व्यक्तीची काळजी घ्यावी. विनाकारण बाहेर फिरू नये. असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष मांडगे यांनी केले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *