Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकनाशिकमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७७ टक्क्यांवर

नाशिकमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७७ टक्क्यांवर

नाशिक । प्रतिनिधी

शहरात करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून अँटिजेन चाचणी हजारापर्यंत करण्यात आल्यानंतर आता ‘मिशन झिरो’अंतर्गत शहरात २० मोबाईल डिस्पेन्सरींमार्फत आरोग्य तपासणी व अँटिजेन चाचणी सुरू करण्यात आली आहे. परिणामी कोविड रुग्ण तत्काळ समोर येऊ लागल्याने संसर्ग रोखण्यास मोठे यश येत आहे. त्यामुळे दाखल रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७५.३८ टक्क्यांपर्यंत गेले आहे. तसेच मृत्यूचे प्रमाण एक टक्क्याने कमी झाले आहे. करोनासंदर्भातील स्थिती बदलल्याने नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

नाशिक महापालिका क्षेत्रात करोनाचा मोठा संसर्ग सुरू झाला असून जुलै महिन्यात प्रतिदिन सुमारे २०० च्या वर नवीन रुग्ण समोर येत आहेत. दररोज सरासरी पाच करोनाबाधितांचा मृत्यू होत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून करोना चाचणी दररोज ५०० आणि अँटिजेन चाचणी १००० अशा एकूण १५०० चाचण्या केल्या जाऊ लागल्या आहेत.

परिणामी रुग्णांचा आकडा वाढला असला तरी संसर्ग रोखण्यात महापालिकेला यश येत आहे. या चाचण्या वाढवण्यात आल्याने बाधित रुग्णाला तत्काळ विलगीकरण कक्षात दाखल केले जात आहे. परिणामी या नवीन बाधित रुग्णांपासून होणारा संसर्ग टाळण्यात महापालिकेला मोठे यश मिळत आहे. ३०

जूनपर्यंत रुग्ण बरे होण्याची टक्केवारी केवळ ४२.६० टक्के होती. आता महापालिकेकडून कोविड रुग्णांवर आणि संशयित रुग्णांवर चांगल्या प्रकारे उपचार केले जात असून दाखल रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६० टक्क्यांवरून ७७ टक्क्यांपर्यंत गेले आहे. आतापर्यंत महापालिका क्षेत्रातून ७९१९ रुग्णांपैकी ६२५८ रुग्ण बरे झाले आहेत. परिणामी शहरातील एकूण कोविड रुग्णांपैकी केवळ २५ टक्केच रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच रुग्ण ठणठणीत बरे होण्याचे प्रमाण वाढले असल्याने यातून नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

शहरात ३० जून रोजी १०० रुग्णांमागे मृत्यूचे प्रमाण ४.८१ टक्के इतके होते. जुलैच्या २८ दिवसांत दररोज सरासरी ५.३९ असे करोना मृत्यूचे प्रमाण होते. मात्र शंभर रुग्णांमागे मृत्यूचे प्रमाण आता ३.१९ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे.

शहरात ३८८ प्रतिबंधत क्षेत्रे

महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात करोना संसर्ग होऊ लागल्याने उपाययोजना म्हणून प्रतिबंधित क्षेत्राचा परिसर वाढवण्यात येऊन त्या भागातील रस्ते बंद करण्याचे काम महापालिका प्रशासनाकडून केले जात आहे. ६ एप्रिल ते २८ जुलै या कालावधीत शहरात प्रतिबंधित क्षेत्रांचा एकूण आकडा अकराशेच्यावर गेला असून रुग्ण बरे झाल्यानंतर जवळपास ७८२ प्रतिबंधित क्षेत्रांतील निर्बंध हटवण्यात आले आहेत. मात्र रुग्ण वाढत असल्याने आजमितीस शहरात ३८८ प्रतिबंधित क्षेत्रे कार्यान्वित असल्याने शहरातील बहुतांशी भाग करोनाच्या विळख्यात आहे.

प्रतिबंधित क्षेत्रातील स्थिती

* आतापर्यंत झालेले एकूण प्रतिबंधित क्षेत्र – ११७०

* निर्बंध हटवण्यात आलेले प्रतिबंधित क्षेत्र – ७८२

* एकूण कार्यान्वित प्रतिबंधित क्षेत्र – ३८८

* एकूण प्रतिबंधित क्षेत्रात इमारती – ३४५

* एकूण मायक्रो झोन – ४३

- Advertisment -

ताज्या बातम्या