COVID19 : देशात गेल्या २४ तासात ३.५५ लाख करोनामुक्त पण मृत्यूचे थैमान काही थांबेना!

COVID19 : देशात गेल्या २४ तासात ३.५५ लाख करोनामुक्त पण मृत्यूचे थैमान काही थांबेना!

दिल्ली | Delhi

करोनाची दुसरी लाट आणि नव्या स्ट्रेनने भारतात चांगलाच कहर केला आहे. एकीकडे केंद्र-राज्यांकडून विविध उपाययोजना केल्या जात असून, करोनाच्या संसर्गाच्या प्रसाराला अद्यापही ब्रेक लागलेला नाही.

तसेच, देशात मृत्यूचं प्रमाण वाढलं असून, ते कायम आहे. देशात गेल्या काही दिवसांपासून साडेतीन ते चार हजारांच्या सरासरीने मृत्यूंची नोंद होत आहे. त्यातच गेल्या २४ तासात देशात करोनाबळींची संख्या नकोशा उच्चांकावर पोहलची आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ३ लाख ४८ हजार ४२१ नवे करोना रुग्ण आढळले असून ४ हजार २०५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

देशातील एकूण करोना रुग्णसंख्या २ कोटी ३३ लाख ४० हजार ९३८ इतकी झाली आहे. तर दुसरीकडे आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २ लाख ५४ हजार १९७ वर पोहोचली आहे.

तसेच देशात गेल्या २४ तासात ३ लाख ५५ हजार ३३८ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. या संख्येसह करोनावर मात करणाऱ्यांची संख्या १ कोटी ९३ लाख ८२ हजार ६४२ वर पोहचली आहे.

महाराष्ट्रातील स्थिती काय?

राज्यात करोना संसर्ग अद्याप सुरूच असला तरी देखील दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या संख्येत आता घट झालेली दिसून येत आहे. तर, दिलासादायक बाब म्हणजे करोनातून रूग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. मागील काही दिवसांपासून सलग राज्यात रोज आढळलेल्या करोनाबाधितांच्या तुलनेत, करोनामुक्त झालेल्याची संख्या ही अधिक असल्याचे दिसून आले आहे.

काल देखील राज्यात ७१ हजार ९६६ रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. तर, ४० हजार ९५६ नवीन करोनाबाधित आढळले असून, ७९३ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ४५ लाख ४१ हजार ३९१ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ८७.६७% एवढे झाले आहे. तर, आजपर्यंत राज्यात ७७ हजार ९१९ रूग्णांचा करोनामुळे मृत्यू झालेला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९% एवढा आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com