Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रपुढील दोन आठवडे धोक्याचे : दिवसाला हजार मृत्यू

पुढील दोन आठवडे धोक्याचे : दिवसाला हजार मृत्यू

मुंबई

महाराष्ट्रामधील करोनाबाधितांची संख्या पुढील दोन आठवड्यांमध्ये वेगाने वाढणार आहे. आता पुढील दोन आठवडे अधिक धोक्याचे असणार आहेत. या कालावधीत राज्यातील अँक्टीव्ह रुग्णसंख्या ३ लाखांपर्यंत पोहोचेल. तसेच दिवसाला एक हजार मृत्यू होतील, असा धोक्याचा इशारा राज्याच्या आरोग्य विभागाने दिला आहे.

- Advertisement -

येत्या चार एप्रिलपर्यंत राज्यातील अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या तीन लाखांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. बुधवारी राज्यात तब्बल ३१,८५५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत दिवसातील ही सर्वाधिक उच्चांक संख्या आहे. राज्यातील एकूण रुग्णांची संख्या २५ लाख ६४ हजारावर पोहोचली आहे. सर्वाधिक रुग्णवाढ ही पुणे, नागपूर आणि मुंबईमध्ये होत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये करोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य सेवा अपुऱ्या पडतील असेही सांगितले जात आहे.

करोनाबाधित रुग्णांचे प्रमाण आठवड्याला एका टक्क्याने वाढत आहे. त्या आकडेवारीच्या आधारे राज्याच्या आरोग्य विभागाने हा अंदाज व्यक्त केला आहे. संकलित करण्यात आलेल्या माहितीच्या आधारे मृत्यू दर हा २.२७ टक्के असल्याचे सांगण्यात आले आहे. याच दराच्या आधारे पुढील दोन आठवड्यांमध्ये राज्यामधील एकूण करोना रुग्णांची संख्या २८ लाख २४ हजार ३८२ इतकी होईल आणि मृतांचा आकडा हा ६४ हजार ६१३ पर्यंत जाईल असा अंदाज व्यक्त करण्यात आहे.

अनेक जिल्ह्यांमध्ये उपचाराच्या योग्य सुविधा नाहीत. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार पुरेशा प्रमाणात नॉन ऑक्सिजन बेड, आयसीयू बेड आणि व्हेंटिलेटर आहेत. पुढील काही दिवसांमध्ये ठाणे आणि नागपूर या दोन जिल्ह्यांमधील बेडची संख्या वाढवली नाही तर परिस्थिती गंभीर होईल अशी भीती राज्यातील आरोग्य विभागाचे सचिव डॉक्टर प्रदीप व्यास यांनी व्यक्त केली आहे.रुग्णांची संख्या पाहून त्या हिशोबाने वेगवेगळ्या ठिकाणी करोना बेड्सची संख्या निश्चित करण्यात यावी . करोनावर मात करुन ठणठणीत झालेल्या, ताप नसलेल्या आणि शरीरामधील ऑक्सिजनचं प्रमाण ९५ टक्क्यांपर्यंत असणाऱ्यांना कोविड केअर सेंटरमध्ये स्थलांतरित करण्यात यावे असे मत व्यास यांनी व्यक्त केले आहे.

चार दिवसांत एक लाख रुग्ण

तीन ते चार दिवसांमध्ये राज्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या एक लाखांनी वाढली आहे. सध्या एकूण अ‍ॅक्टीव्ह रुग्णांपैकी ४१ टक्के रुग्ण रुग्णालयामध्ये आहेत. त्यापैकी ८ टक्के गंभीर तर ०.७१ टक्के रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या