Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याकोरोमंडल एक्स्प्रेसची मालगाडीला धडक; जीवितहानीची भीती

कोरोमंडल एक्स्प्रेसची मालगाडीला धडक; जीवितहानीची भीती

बालासोर । वृत्तसंस्था Balasor

हावडाहून चेन्नईला जाणार्‍या कोरोमंडल एक्स्प्रेसला भीषण अपघात झाला असून ओडिशातील बालासोरपासून सुमारे 40 किमी अंतरावर या एक्स्प्रेसची मालगाडीसोबत टक्कर होऊन झालेल्या अपघातात एक्स्प्रेसचे काही डब्बे रुळावरुन घसरले आहेत.

- Advertisement -

या घटनेत शेकडो प्रवासी जखमी झाल्याची आणि काहीजण दगावल्याची भीती व्यक्त होत आहे. बहनगा स्टेशनजवळ संध्याकाळच्या सुमारास हा अपघात झाला. प्रशासनाने अपघाताबाबत आपत्कालीन नियंत्रण कक्ष क्रमांक 6782262286 जारी केला आहे.

या भीषण अपघातात एक्स्प्रेसचे डबे उलटल्याने काही प्रवासी अडकले असल्याने मदत आणि बचावकार्य वेगाने सुरू होते. या मार्गावरून जाणारी रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली आहे.

विशेष मदत आयुक्त कार्यालयाने माहिती दिली की, अपघातस्थळी शोध आणि बचाव कार्यासाठी पथके घटनास्थळी पोहोचली आहेत. त्याचबरोबर बालासोरच्या जिल्हाधिकार्‍यांनाही सर्व आवश्यक व्यवस्था करण्यासाठी घटनास्थळी पोहोचण्यास सांगण्यात आले असून राज्यस्तरावरून काही अतिरिक्त मदतीची आवश्यकता असल्यास एसआरसीलाही कळविण्यात आले आहे. याशिवाय रेल्वे रुळावरून डबे हटवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्याचवेळी, एका रुळावर दोन गाड्या कशा आल्या याचा तपासही रेल्वेने सुरू केला आहे.

अपघात कशामुळे झाला?

कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडी या दोन्ही गाड्या एकाचवेळी एकाच रुळावर आल्याने हा अपघात झाला. सिग्नल यंत्रणेतील दोषामुळे दोन्ही गाड्या एकाचवेळी एका रुळावर आल्याचे म्हटले जात आहे. मात्र, अद्याप या अपघाताबाबत रेल्वेकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. कोरोमंडल एक्सप्रेस ही चेन्नई ते पश्चिम बंगालमधील हावडा मार्गे ओडिशा पर्यंत धावते.

- Advertisment -

ताज्या बातम्या