
पंचवटी । प्रतिनिधी Panchavati
नाशिक जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक व सहकारी संस्थांचे योगदान नेहमीच प्रेरणादायी ठरले आहे. समाजाच्या व तळागाळातील विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करणार्या संस्था जिल्ह्याला लाभल्या आहेत. शैक्षणिक संस्थातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग नेहमीच संस्थेच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करत असतात. नाशिक जिल्हा कॉलेज टीचर सहकारी पतसंस्थेने( Nashik District College Teachers Co-operative Credit Institution) प्रेरणादायी काम केले आहे, असे प्रतिपादन खा. शरद पवार (MP Sharad Pawar )यांनी केले.
नाशिक जिल्हा कॉलेज टीचर सहकारी पतसंस्थेच्या नूतन कार्यालयाचा लोकार्पण सोहळा पंचवटीतील धनदाई लॉन्स येथे संपन्न झाला. या सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना खा. पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे होते.
यावेळी मार्गदर्शन करताना खा. पवार पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील समाजधुरिणांनी दूरदृष्टीने सुरू केलेल्या शैक्षणिक व सहकारी संस्थांचे कार्य विठ्ठलराव हांडे, मालोजीराव मोगल तसेच डॉ. वसंतराव पवार यांच्यासारख्या सामाजिक बांधिलकी जपणार्या लोकांनी सामान्य माणसांच्या अडचणी सोडवण्यासाठी, शेतकरी तसेच समाजहिताची जपवणूक करत चालू ठेवले याचा अभिमान वाटतो. या सर्वांच्या मार्गदर्शनामुळे व सध्या कार्यरत असलेल्या सर्व घटकांच्या एकीमुळे संस्था आजही प्रगतीपथावर आहेत. कॉलेज टीचर सहकारी पतसंस्थेतील सर्व सभासदांनी सर्व कुटुंबांना आधार देण्याचे महत्त्वपूर्ण काम करून आदर्श निर्माण केला आहे ही संस्था संकट मोचक संस्था आहे शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान देणारी प्रेरणादायी संस्था आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी व्यासपीठावर आ. छगन भुजबळ, आ. माणिकराव कोकाटे, आ.दिलीपराव बनकर, माजी आ. हेमंत टकले, रवींद्र पगार, प्रा. नानासाहेब दाते,प्रा. शिवाजी वाघ, अशोक बाजारे उपस्थित होते. यावेळी छगन भुजबळ यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की संस्था टिकवून मोठं करणे कार्यकर्त्यांचे काम असते. नाशिक जिल्हा सहकार क्षेत्रात अग्रेसर होता, आज मात्र संस्था अडचणीत आलेल्या आहेत. संस्थांची खूपच वाताहात झाली आहे, मात्र नाशिक जिल्हा कॉलेज टीचर सहकारी पतसंस्थेचे कार्य प्रेरणादायी आहे. या पतसंस्थेच्या सर्व सभासदांनी 116 सभासदांना रुपये तीन हजाराची मदत करून कर्जमुक्त केले. संस्था अडचणीत येऊ नये याची काळजी घेतली. संस्थेचे कार्य कौतुकास्पद आहे.
याप्रसंगी मविप्र समाज संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, सभापती बाळासाहेब क्षिरसागर, उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, उपसभापती डी. बी. मोगल, चिटणीस दिलीप दळवी, डॉ. सयाजीराव गायकवाड, रमेश आबा पिंगळे, संदीप गुळवे, लक्ष्मणराव लांडगे, अमित बोरस्ते, भगीरथ शिंदे, अरविंद कारे, माणिकराव बोरस्ते, डॉ. भाऊसाहेब मोरे, राजेंद्र मोगल, माणिकराव वनारसे उपस्थित होते.
स्वागत प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष प्रा. नानासाहेब दाते यांनी केले. अध्यक्षीय मनोगत मविप्र समाज संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे यांनी व्यक्त केले. प्रा अशोक सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. सोपानराव एरंडे यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. संजय शिंदे, राजेंद्र धनवटे, डॉ. सोपान एरंडे, प्रा. अनिल भंडारे, अण्णा टरले, रवींद्र गोडसे, प्रा. संपत कदम, प्रा. सुनिता कचरे, प्रा. सीताराम निकम, डॉ. विक्रम काकुळते, प्रा. संपतराव काळे, प्रा. यशवंत शिरसाठ, डॉ. कल्पना अहिरे, वैशाली कोकाटे, सुभाष कापडी आदींनी परिश्रम घेतले.