
मुंबई | प्रतिनिधी Mumbai
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने संघटनात्मक तयारीची चाचपणी सुरू केली आहे. काँग्रेस पक्षाची राज्यातील प्रत्येक मतदारसंघात संघटनात्मक ताकद असल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. काँग्रेस पक्ष सर्व मतदारसंघाचा आढावा घेणार असला तरी त्याचा आघाडीच्या जागा वाटपावर काही परिणाम होणार नाही. भाजपाचा पराभव करणे हेच आमचे लक्ष्य असून या बैठकीनंतर मविआच्या होणा-या बैठकीत पुढची रणनिती निश्चित केली जाईल, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली. सर्वच्या सर्व ४८ मतदारसंघात भाजपाचा पराभव कसा करता येईल याची रणनिती ठरविली जात असल्याचेही ते म्हणाले.
आगामी लोकसभा निवडणुकीत मोठा विजय कसा संपदान करायचा यावर विचारमंथन केले जात आहे. प्रत्येक जागेचा आढावा घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. मुंबईतील टिळक भवन प्रदेश काँग्रेस कमिटीची होत असलेल्या दोन दिवसांच्या लोकसभा मतदारसंघाचा आढावा बैठक शुक्रवारपासून सुरू झाली. शुक्रवारी पहिल्या दिवशी नाशिक, दिंडोरी, जळगाव, रावेर, धुळे, नंदुरबार, अहमदनगर, शिर्डी, सिंधुदुर्ग-रत्नागिरी, ठाणे, लातूर, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ वाशिम, गडचिरोली चिमूर, चंद्रपूर, भंडारा गोंदिया, वर्धा, नागपूर, रामटेक व पालघर या लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला.
याबाबत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, कर्नाटकात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा दारूण पराभव झाला. ३० मतदारसंघात भाजपच्या महत्वाच्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. देशभर काँग्रेस हाच पर्याय असून भाजपविरोधात जनतेत मोठा असंतोष आहे. महाराष्ट्र हे उत्तर प्रदेशनंतर सर्वात जास्त ४८ जागा असणारे राज्य आहे. या प्रत्येक जागेवर विजयी होण्यासाठी काय करता येईल याची व्यूहरचना या बैठकीत ठरवली जात आहे. मविआचे घटक पक्ष असलेल्या समाजवादी पक्ष, शेकाप, कम्युनिस्ट पक्षालाही जागा वाटपावेळी विचारात घेतले जाईल, असे पटोले म्हणाले.
उद्योगपती गौतम अदानी व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, कोण कोणाला भेटतो याच्याशी आमचे काही देणेघेणे नाही. अदानी पवारांच्या घरी रहायला गेले तरी आम्हाला त्याचे काही नाही. ते कोणाला भेटतात हा आमच्यासाठी महत्वाचा प्रश्न नाही. अदानी व काँग्रेसची वैयक्तिक शत्रुत्व नाही. परंतु आमचे नेते राहुल गांधी यांनी उपस्थित केलेले प्रश्न महत्वाचे आहेत. मोदी-अदानी यांचा संबंध काय? आणि अदानीच्या कंपनीत २० हजार कोटी रुपये कुठून आले? सर्व कंपन्या अदानीलाच काय विकल्या जात आहेत? अदानी घोटाळ्याची संयुक्त संसदीय समितीकडून चौकशी करावी ही काँग्रेसची मागणी कायम आहे. हा जनतेच्या पैशाचा प्रश्न आहे म्हणून काँग्रेस जाब विचारत राहणार, कोणाला व्यक्तिगत संबंध ठेवायचे असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे.
देशात मोदीविरोधात वातावरण- अशोक चव्हाण
देशातील राजकीय परिस्थिती झपाट्याने बदलत असून, केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात वातावरण आहे. त्याला बळ देण्याचे काम कर्नाटकच्या निकालाने केले आहे. या आढावा बैठकीच्या निमित्ताने राज्यातील राजकीय परिस्थिती, वस्तुस्थिती काय आहे, त्या त्या मतदारसंघातील लोकांचे काय म्हणणे आहे, कोणत्या मुद्द्यासंदर्भात विषय आहे आदीबाबत पदाधिकाऱ्यांकडून प्रतिक्रिया घेण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर जागा वाटपासंदर्भात त्या त्या जिल्ह्यातील प्रमुख नेते व कार्यकर्त्यांचे म्हणणे लक्षात घेऊन निर्णय घेतला जाईल. प्रत्येक पक्षाने जागावाटपासंदर्भात भूमिका मांडावी, जेणेकरून जागेची निश्चिती करता येईल, अशी भूमिका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.