
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप (Devendra Fadnavis and BJP) यांनीच राज्यातील तरुणांना नोकऱ्यांपासून वंचित ठेवले आहे. राज्यात येणारे प्रकल्प गुजरातला पळवले आणि सरकारी नोकर भरतीचा खेळखंडोबा करुन तरुणांचे आयुष्य बरबाद केले आहे. त्यामुळे ही आंदोलनाची नौटंकी बंद करून भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांनीच महाराष्ट्राची नाक घासून माफी मागावी. तसेच या पापातील त्यांचे भागीदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना माफी मागायला सांगावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी शनिवार (दि.२१) रोजी केली...
बाह्य स्त्रोतातून कंत्राटी भरती करण्याचा उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागाचा शासन आदेश रद्द करत असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केली. तसेच सरकारचा हा निर्णय जाहीर करताना फडणवीस यांनी कंत्राटी भरतीचे पाप काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांचे असल्याचे सांगत याप्रकरणी शरद पवार, ठाकरे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी केली आहे. त्यानंतर भाजपने आज मुंबईत (Mumbai) आंदोलन (Agition) केले.
या पार्श्वभूमीवर बोलतांना पटोले यांनी आज भाजपवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, भाजप हा एक नंबरचा खोटारडा पक्ष आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात (RSS) खोटे बोलण्याचेच प्रशिक्षण दिलेले आहे. त्यामुळे भाजप नेते सातत्याने खोटे बोलत असतात. कंत्राटी पद्धतीच्या नोकरी भरतीमध्येही देवेंद्र फडणवीस यांनी लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पण राज्यातील जनता विशेषतः तरुण मुले-मुली यांना भाजपचा हा खोटारडेपणा समजतो, अशी टीका पटोले यांनी केली.
राज्यात अडीच लाख सरकारी पदे रिक्त असताना ही पदे भाजप सरकार भरत नाही. शिक्षक भरती, पोलीस भरती, एमपीएससी परिक्षा, तलाठी भरती मधील घोटाळा हे पाप भाजपचेच आहे हे सांगण्यासाठी कोणत्या ज्योतिषाची गरज नाही. काही तरुण मुले,मुली दोन-तीन वर्षापासून केवळ नियुक्तीपत्र मिळाले नाहीत म्हणून नोकरीवर रुजू होऊ शकलेले नाहीत. एमपीएससीचा सावळा गोंधळ सुरुच आहे. तहसीलदार, नायब तहसीलदार सारखी अत्यंत जबाबदार आणि महत्वाची पदे एमपीएससीकडून न भरता कंत्राटी पद्धतीने भरण्याचा जीआर मागच्याच महिन्यात काढला होता. पण खोटारडे फडणवीस स्वतःचे पाप दुसऱ्यावर टाकून नामानिराळे राहण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत, असे पटोले म्हणाले.
तसेच शिंदे प्रणित भाजप सरकारने वेदांता फॉक्सकॉन, टाटा एअर बस सारखे विविध मोठे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर घालवून महाराष्ट्रातील आपल्याच लाखो तरुणांचा रोजगार हिरावून घेण्याचे पाप केले. शेतकरी आत्महत्या वाढल्या, शेतमालाला भाव नाही याचे पाप भाजप सरकारचेच आहे. गुन्हेगारी वाढली, महागाई वाढली, सत्ताधारी आमदार खासदारांची दादागिरी वाढली. खोके घेऊन महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचे पापही भाजपनेच केले आहे. या सर्व पापांबद्दल भाजप, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्राच्या १२ कोटी जनतेची शंभरवेळा नाक घासून माफी मागितली तरी त्यांचे पाप फिटणार नाही, असा टोला नाना पटोले यांनी लगावला.