काँग्रेसचे निषेध आंदोलन

मुंबई प्रतिनिधी Mumbai

काँग्रेस नेते राहुल गांधी ( congress Leader Rahul Gandhi ) यांची सलग तिसऱ्या दिवशी ईडीने ( ED )चौकशी केली. ही चौकशी केंद्र सरकारच्या इशाऱ्यावरून करण्यात आली आहे. गांधी कुटुंबाला राजकीयदृष्ट्या संपवण्याच्या सूडभावनेने ही कारवाई केली जात आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole) यांनी केला.

काँग्रेस पक्ष अशा दडपशाहीला घाबरत नाही. दिल्ली पोलिसांना हाताशी धरून भाजपने दिल्लीत काँग्रेसचे नेते, खासदार, पदाधिकारी यांच्यावर अत्याचार चालवला आहे. पण ब्रिटीश सत्तेला नामोहरम करून पळून लावणारा काँग्रेस पक्ष इंग्रजांच्या हस्तकांच्या या दडपशाहीला भीक घालणार नाही. राहुल गांधी यांच्यावरील कारवाई म्हणजे भाजपची उलटी गिनती सुरु झाल्याचे द्योतक असल्याची टीका पटोले यांनी केली.

ईडीने आज सलग तिसऱ्या दिवशी राहुल गांधी यांची चौकशी केली. या चौकशीच्या निषेधार्थ नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर टीका केली.

देशात अत्यंत भयानक परिस्थिती आहे. सूडाने पेटून उठलेल्या भाजपचे सरकार दिल्लीत सत्याग्रहासाठी आलेले काँग्रेसचे मुख्यमंत्री, मंत्री, खासदार यांच्यावरही हल्ले करत आहे. दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात घुसून तेथील नेत्यांनाही मारहाण करण्यात आली. इंग्रज सरकारपेक्षाही वाईट सरकार केंद्रात आहे. पंरतु काँग्रेस पक्ष बलाढ्य अशा इंग्रज सत्तेला घाबरला नाही उलट त्यांना देश सोडून जाण्यास भाग पाडले. तेव्हा ब्रिटिंशाविरोधात लढलो आता ब्रिटिशांच्या हस्तकांविरोधात लढत आहोत, असा हल्लाबोल पटोले यांनी केला.

राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर केंद्र सरकार आणि भाजपकडे उत्तर नाही. त्यामुळे त्यांचा आवाज दडपण्यासाठी ही कारवाई करत आहेत. केंद्र सरकारच्या या दडपशाहीविरोधात काँग्रेसच्यावतीने उद्या, १६ जूनला राजभवनसमोर तर परवा १७ तारखेला राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आंदोलन करून भाजप सरकारच्या दडपशाहीचा तीव्र निषेध करण्यात येणार असल्याचे पटोले यांनी सांगितले.

राजभवनवर केल्या जाणाऱ्या आंदोलनातून लोकांची जनभावना राज्यपालांच्या माध्यमातून केंद्र सरकारला कळवली जाणार आहे, अशी माहिती अशोक चव्हाण यांनी यावेळी दिली. देशात सध्या आणीबाणीपेक्षाही वाईट परिस्थिती आहे. केंद्रातील सरकारने सर्व मर्यादा पार केल्या असून दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात घूसून काँग्रेस नेते आणि पत्रकारांना मारहाण करून कलम १४४ लावण्यात आले, असे सांगत चव्हाण यांनी कोणत्याही कार्यालयात कलम १४४ कसे काय लागू शकते, असा प्रश्न केला.

केंद्रातील मोदी सरकार राहुल गांधी यांना घाबरले आहे. राहुल गांधी यांनी अर्थव्यवस्था, कोरोना, बेरोजगारी, केंद्राच्या लोकविरोधी धोरणांवर सातत्याने टीका करून प्रश्न विचारले. त्यांच्या एकाही प्रश्नाचे उत्तर नरेंद्र मोदी किंवा त्यांच्या मंत्र्यांना देता आले नाही. त्यामुळे त्यांना ईडीची नोटीस पाठवून त्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला.

पत्रकार परिषदेनंतर नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस नेत्यांनी रिगल सिनेमाजवळ रस्त्यावर उतरून आंदोलन करून मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *