काँग्रेस पक्ष एकसंध

थोरातांशी मतभेद नसल्याचा प्रदेशाध्यक्ष पटोले यांचा खुलासा
काँग्रेस पक्ष एकसंध

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात( Balasaheb Thorat) व आपल्यामध्ये कोणतेही वाद नाहीत आम्ही एकत्रच आहोत. मात्र नागपूर व अमरावतीतील पराभवाकडे दुर्लक्ष व्हावे यासाठी भाजपाने आमच्यात मतभेद असल्याचे वातावरण निर्माण केले आणि माध्यमांनी त्याला हवा दिली असे भाष्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole ) यांनी केले आहे.

काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक( Congress state executive meeting) टिळक भवन येथे पार पडली. या बैठकीत बोलताना पटोले म्हणाले की,विधान परिषदेच्या अमरावती पदवीधर आणि नागपूर शिक्षकी मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचा पराभव करून काँग्रेसने विजय मिळवला आहे. कसबापेठ आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीतही महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील. भाजपच्या कारभाराला जनता कंटाळली असून त्यांचा पराभव करण्यासाठी आणि आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसला एक नंबरचा पक्ष करण्याचा संकल्प करा, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी येथे केले.

राज्यातील राजकीय परिस्थिती अस्थिर आहे, विधान परिषदेच्या निवडणुकीतील वातावरण पाहता राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला भिती वाटू लागली आहे म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टाळल्याजात आहेत, असा आरोप माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी यावेळी केला. आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकाही एकत्रितच घेतल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी वर्ष हे महत्वाचे आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेचा विजय झाला असून ही विजयाची पहिली पायरी आहे. आता आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या कामाला आतापासूनच लागा, असे आवाहन चव्हाण यांनी यावेळी केले.

या बैठकीला माजी पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, चंद्रकांत हांडोरे, खासदार कुमार केतकर, माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, हुसेन दलवाई, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री विजय वडेट्टीवार, सुनील केदार, यशोमती ठाकूर, डॉ. विश्वजित कदम, सतेज बंटी पाटील, वसंत पुरके, आमदार प्रणिती शिंदे आदी उपस्थित होते.

पटोले यांचा गौप्यस्फोट

यावेळी बोलताना पटोले यांनी विधान परिषदेच्या अमरावती निवडणुकीबाबत खळबळजनक दावा केला. 50 कोटी रुपये देऊन अमरावतीचा निकाल फिरवण्यात येणार होता, पण मी आयुक्तांना इशारा दिला आणि ते टाळले, असा सनसनाटी गौप्यस्फोट त्यांनी केला. ही रक्कम नंतर 100 कोटीपर्यंत जाण्याची शक्यता होती, असेही ते म्हणाले. अमरावतीमध्ये महाविकास आघाडीच्या धीरज लिंगाडे यांनी सर्वाधिक मते घेतली. पण त्यांना विजयी घोषित करण्यात येत नव्हते. निवडणुकीची मतमोजणी 30 तासांपर्यंत सुरू होती. त्यावेळी मला आयबीमधून एका मित्राचा फोन आला. त्याने सांगितले की अमरावतीचा निकाल बदलण्याची तयारी सुरू आहे. हे ऐकल्यानंतर मी अस्वस्थ झालो होतो आणि मला रात्रभर झोप आली नाही, असेही पटोले म्हणाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com