कॉंग्रेस नेते अशोक चव्हाणांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश; राज्यसभेची उमेदवारी मिळणार?

कॉंग्रेस नेते अशोक चव्हाणांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश; राज्यसभेची उमेदवारी मिळणार?

मुंबई | Mumbai

काल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी पक्षाच्या सदस्यत्वासह आमदारकीचा राजीनामा दिल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर कालपासून चव्हाण हे भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. यानंतर अखेर आज या चर्चेला पूर्ण विराम मिळाला असून अशोक चव्हाणांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला...

अशोक चव्हाण यांच्यासोबत कॉंग्रेसचे विधानपरिषदेचे माजी आमदार अमर राजूरकर यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. त्यानंतर आता चव्हाण यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. चव्हाणांच्या पक्षप्रवेशानंतर भाजपकडून लगेचच राज्यसभा उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाण्याची शक्यता आहे.

तर दुसरीकडे राज्यसभा निवडणुकीत भाजपने चौथा उमेदवार उभा केल्यास अशोक चव्हाण गटातील काँग्रेस आमदारांकडून (Congress MLA) क्रॉस व्होटिंग होण्याची दाट शक्यता आहे. तसेच अनेक काँग्रेस आमदारांनी अशोक चव्हाण यांना फोन करुन आम्ही तुमच्यासोबत असल्याचे सांगितले आहे. परंतु, तुर्तास आम्हाला पक्षांतरबंदी कायद्यामुळे तुमच्यासोबत भाजपमध्ये येता येणार नाही. आम्ही योग्यवेळी तुमच्यासोबत येऊ, असे या काँग्रेस आमदारांनी अशोक चव्हाण यांना सांगितल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याआधी माध्यमांशी बोलताना सांगितले होते की, "आजपासून भाजपसोबत नव्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात करत आहे. दुपारी साडेबाराच्या सुमारास मी नव्या पर्वाला सुरुवात करत आहे. आता कोण काय बोलतंय हे मला बघायचं नाही त्यावरती मी नंतर बोलेल. आज पक्ष प्रवेश होईल. त्यानंतर उद्या सर्व गोष्टींवर मी सविस्तर बोलेन, असे चव्हाण म्हणाले होते.

राज्याच्या राजकारणात होल्ड असणारा नेता म्हणून अशोक चव्हाण यांच्याकडे पाहिलं जातं. मराठवाड्यातही अशोक चव्हाण यांच्या नावाला वलय आहे. अशोक चव्हाण यांना मानणारा मोठा वर्ग आहे. अशोक चव्हाण हे राज्याचे दिवंगत मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे सुपुत्र आहेत. त्यामुळे मराठवाडा आणि विशेषत: नांदेडमध्ये त्यांना लोकांचा पाठिंबा आहे. हिंगोली, लातूर आणि अर्थातच नांदेड लोकसभा मतदारसंघातील राजकारणात अशोक चव्हाण यांचा होल्ड आहे. अशोक चव्हाण यांच्यावर बालपणापासूनच काँग्रेसी विचारांचा प्रभाव राहिला. अशोक चव्हाण यांचे वडील शंकरराव चव्हाण हेदेखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले. त्यामुळे लहानपणापासूनच अशोक चव्हाण यांच्यावर राजकारण आणि समाजकारणाचे संस्कार झाले. पुणे विद्यापीठात शिकत असताना अशोक चव्हाण हे विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी बनले. विद्यार्थी प्रतिनिधी ते राज्याचे मुख्यमंत्री असा त्याचा राजकीय प्रवास राहिला. आज त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

चव्हाणांच्या प्रवेशानंतर फडणवीस म्हणाले...

अशोक चव्हाणांच्या प्रवेशामुळे लोकसभा निवडणुकीत महायुतीला बळ मिळेल, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशोक चव्हाण आणि अमर राजूरकर यांचं भाजपत स्वागत करतो. चव्हाण यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याच्या प्रवेशानं भाजप आणि महायुतीची शक्ती भक्कम झाली असून वाढली आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या प्रकारे भारताला विकसित करण्याचं स्वप्न पूर्णत्वाकडं नेण्याचं काम सुरू केलं आहे. जो बदल आणि परिवर्तन भारतात दिसायला लागला, त्यामुळे आपणही देशाच्या मुख्य प्रवाहात आणि मोदींसारख्या मजबूत नेतृत्वात काम करावं असं अनेकांना वाटतं. देशाला पुढं नेण्याचा मोदींचा प्रयत्न आहे. त्यात आपणही वाटा उचलावा अशा प्रकाराचा विचार अनेक नेत्यांमध्ये आला. त्यातले प्रमूख नेतृत्व म्हणून अशोक चव्हाणांकडे बघू शकतो. अशोक चव्हाणांनी भाजपत बिनशर्त प्रवेश केला आहे. 'विकासाच्या मुख्यधारेत योगदान देण्याची संधी मला द्यावी. मला पदाची कुठलीही लालसा नाही,' असं चव्हाणांनी सांगितलं, अशी माहिती फडणवीसांनी दिली. अशोक चव्हाण आणि अमर राजूरकर यांचा प्रवेश झाला आहे. लवकरच हजारो कार्यकर्ते आणि नेत्यांच्या प्रवेशाचा कार्यक्रम निश्चित आयोजित करू. चव्हाणांच्या प्रवेशामुळे लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र आणि मराठावाड्यात महायुतीला विशेष बळ मिळेल. याचा आम्हाला निश्चित फायदा होईल," असं फडणवीसांनी म्हटलं.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com