पक्ष कोमात तरी टक्का वाढवण्यासाठी तयारी जोमात

jalgaon-digital
6 Min Read

नाशिक | विजय गिते | Nashik

एक आटपाटनगर होते… तेथे एक राजा राज्य करीत होता… या राज्यातील प्रजा विकास होत असल्याने सुखी व समृद्ध होती…मात्र, राज्याची परिस्थिती काहीशी खालावली… अन राज्याची सत्ता गेली… आता ही सत्ता पुन्हा कशी मिळवायची? ती काहीअंशी का होईना, गतकाळातील पुनर्वैभव प्राप्त व्हावे, यासाठी सैनिक पुन्हा जोमाने लढाईसाठी मैदानात उतरण्याची तयारी करत आहेत. अशीच काहीशी अवस्था नाशिक शहर काँग्रेसची (Congress) झाली आहे…

चारवेळा महापौरपद भूषविलेल्या काँग्रेसने आता महानगरपालिकेमध्ये (Nashik NMC) टक्का (नगरसेवक) वाढविण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी नगरसेवकांची संख्या सहा वरून किमान 15 ते 18 च्या वर कशी जाईल, यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्ते रणांगणात उतरण्याची तयारी करत आहेत.

नाशिक महानगरपालिका निवडणूक (Nashik NMC Election) आता तोंडावर आली असल्याने एकीकडे पक्षाची तयारी सुरू असली तरी दुसरीकडे मात्र काँग्रेस शहराध्यक्षपदाचा वाद अजूनही मिटू शकलेला नाही.

त्यामुळे प्रदेश पदाधिकारी तथा प्रभारी शहराध्यक्ष शरद आहेर (Sharad Aher) यांना जोपर्यंत शहराध्यक्षपदी नव्याने नियुक्ती होत नाही, तोपर्यंत नाशिक महानगरपालिकेत काँग्रेसचे अधिकाधिक नगरसेवक निवडून आणण्यासाठी तयारी करावी लागणार आहे. अन्य राजकीय पक्षांच्या तुलनेत काँग्रेस पक्ष निवडणूक तयारीच्या दृष्टीने पिछाडीवर असल्याची चर्चा पक्षांतर्गतच आहे.

गत निवडणुकीत काँग्रेसचे सहा नगरसेवक निवडून आले होते. सद्यस्थितीत काँग्रेसमध्ये (Congress) ब्लॉकनिहाय बैठका पार पडल्या असून काँग्रेस पक्षाची बूथनिहाय डिजिटल नोंदणी सुरू झाली आहे. त्याचा फायदा पक्षाला निवडणुकीत (Election) होईल. त्यासाठी ब्लॉकनिहाय उमेदवारी अर्ज मागविले जात आहेत. त्या अर्जांची छाननी येत्या दोन- तीन दिवसात होणार आहे. जुन्या प्रभागांनुसार इच्छूकांनी पूर्वी अर्ज केले होते.

आता नवीन प्रभागांनुसार त्यात बदल करण्याचे काम सुरू आहे. महापालिका निवडणुकीसाठी 50 टक्के महिलांसाठी आरक्षण आहे. त्यादृष्टीने इच्छूक महिलांसाठी प्रशिक्षण शिबिरे घेतली जाणार आहेत.

राज्यात सध्या काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस असे महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार आहे. हीच महाविकास आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही एकत्र येऊन निवडणूक लढवेल, असे काहीसे चित्र राज्यात सत्ता स्थापन झाल्यानंतर निर्माण झाले होते. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या असतानाच प्रत्येक पक्षाने स्वबळाची तयारी सुरू केली आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी यापूर्वीच स्वबळाचा नारा दिलेला आहे. त्यानुसार नाशिक शहरातही स्वबळाची तयारी सुरू झाली आहे. शहर काँग्रेसतर्फे ब्लॉक अध्यक्ष आणि निरीक्षक यांना त्या त्या प्रभागाच्या जबाबदार्‍या वाटून दिलेल्या आहेत. जे निरीक्षक आहेत ते काँग्रेसकडून निवडणूक लढवू इच्छिणार्‍यांकडून फॉर्म भरून घेत आहेत.

नाशिक शहर तसा काँग्रेसचा पूर्वीचा बालेकिल्ला. मात्र, गत काही वर्षांपासून काँग्रेसची परिस्थिती खालावत गेली आहे. चार वेळा महापौरपद भूषविणार्‍या काँग्रेसकडे आज केवळ अर्धा डझन इतकेच नगरसेवक आहेत. त्यामुळे महानगरपालिकेत काँग्रेसचा टक्का वाढविण्याच्या दृष्टीने काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सर्वोतोपरी प्रयत्न करू लागले आहेत. पूर्व नाशिक, पश्चिम नाशिक, पंचवटी, नाशिकरोड, नवीन नाशिक, सातपूर या प्रभागांमध्ये ही तयारी सुरू झाली असून आता बुथनिहाय तयारी सुरू करण्यात आली आहे. काँग्रेसचे सदस्य कसे वाढतील यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

प्रभाग रचना झालेली नसल्याने काहीशी अडचण होत होती. मात्र, आता प्रभाग रचनाही पूर्ण झाली असून काँग्रेसकडे येणार्‍यांचा कल वाढतो आहे, असे सांगितले जात आहे. मात्र, जे काँग्रेसमध्ये प्रवेश करू इच्छितात त्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या उपस्थितीतच प्रवेश करण्याची अट घातलेली आहे.

त्यामुळे हे प्रवेश काहीसे लांबणीवर पडत असल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेसने स्वबळावर नाशिक महानगरपालिकेत (Nashik NMC) निवडणूक लढविली तर अधिकाधिक चांगले प्रयत्न करून काँग्रेसचा टक्का वाढविण्यासाठी आता काँग्रेसचे पदाधिकारी व निरीक्षक जोर-बैठका काढत असून मतदारांशी त्यांनी संपर्क वाढविला आहे.

खाते उघडावे लागणार

काँग्रेसची सद्यस्थिती पाहता मध्य नाशिकमध्ये काँग्रेसचे बलाबल तसे समाधानकारक आहे. मात्र, त्या तुलनेत पश्चिम नाशिक, नवीन नाशिक, सातपूर, नाशिकरोड येथे मात्र गतवेळी पक्षाला खातेही उघडता आलेले नाही. परंतु आता या भागात दोन ते पाचपर्यंत तरी किमान नगरसेवक निवडून येतील, अशी परिस्थिती राहील असे सांगितले जात असून तशी तयारीही सुरू करण्यात आलेली आहे.

नाशिक पूर्वमधून सद्यस्थितीत राहुल दिवे व आशा तडवी हे दोन नगरसेवक आहेत तर मध्य नाशिकमधून शाहू खैरे, वत्सला खैरे, समीर कांबळे, डॉ. हेमलता पाटील हे चार नगरसेवक आहेत. पंचवटीमधून पूर्वीच्या काळी काँग्रेस नगरसेविका राहिलेल्या व विद्यमान नगरसेविका विमल पाटील यांनी काँग्रेसचे सहयोगी नगरसेवक म्हणून नोंदणी केलेली आहे.

त्यामुळे काँग्रेसची सद्यस्थितीत नाशिक महानगरपालिकेत सात नगरसेवक संख्या आहे. काँग्रेसला आता नाशिकरोड आणि सिडको या भागातून अधिकाधिक नगरसेवक निवडून आणण्याचे ‘धनुष्य’ पेलावे लागणार आहे.

काँग्रेससमोर आव्हाने

नाशिक महानगरपालिका ज्यावेळी अस्तित्वात आली तेव्हापासून सलग चार वेळा काँग्रेसचाच महापौर राहिलेला आहे.यामध्ये स्वर्गीय शांताराम वावरे, स्वर्गीय पंडितराव खैरे, यांच्यासह प्रकाश मते व शोभा बच्छाव यांनी काँग्रेसचे महापौर म्हणून नाशिकचे नेतृत्व केलेले आहे. या काळात काँग्रेसने अनेक विकास कामे केली असे काँग्रेसच्या गोटातून सांगितले जात आहे.

मात्र काँग्रेसची सत्ता गेल्यापासून विरोधकांकडे सत्ता गेल्यानंतर नाशिक शहराचा विकास खुंटला असल्याचा दावाही काँग्रेसकडून केला जात आहे. नाशिक महानगरपालिका क्षेत्रामध्ये काँग्रेसने महानगरपालिकेच्या माध्यमातून अनेक सुविधा दिल्या आहेत. त्यामध्ये पाण्याची थेट पाईपलाईन घराघरापर्यंत पोहोचविण्याचे काम केले आहे.

तसेच प्रकाश मते हे महापौर असताना काँग्रेसनेच नाशिक शहरात घंटागाडीचा प्रकल्प आणलेला आहे. काँग्रेसने अनेक कामे राज्यात व नाशिक शहरात सत्ता असताना केली आहेत.मात्र ही विकास कामे मतदारांपर्यंत म्हणजेच तळागाळातील लोकांपर्यंत आणि तरुणांपर्यंत पोहोचविण्याचे काम काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पाहिजे तसे जमले नाही, अशी खंतही काँग्रेस अंतर्गत व्यक्त केली जात आहे.

मात्र सन 2022 मध्ये होऊ घातलेल्या नाशिक महानगरपालिका निवडणुकीत ही तूट भरून काढण्यासाठी सर्वांनी कंबर कसल्याचे सांगितले जात आहे. यासाठी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे काँग्रेसच्या काळात कसा अधिकाधिक विकास झाला आहे हे तरुणांपर्यंत व नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करणार असल्याचे सांगितले जात आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *