Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याचढाओढीत वाहतूक कोंडी

चढाओढीत वाहतूक कोंडी

पंचवटी । दिलीप अहिरे Panchavati

पंचवटीतील मुंबई – आग्रा महामार्गावरील( Mumbai- Agra Highway ) जुना व नवा आडगाव नाका (Adgaon Naka )तसेच अमृतधाम, बळी मंदिर व हॉटेल जत्रा समोरील चौकात दररोज होणार्‍या वाहतूक कोंडीने प्रवासी वर्ग नागरिक आणि वाहन चालक त्रस्त झाले असून या ठिकाणी वाहतूक कोंडीवर निश्चित काहीतरी उपाययोजना करावी व वाहतूक कोंडीपासून होणार्‍या त्रासापासून मुक्तता करावी अशी मागणी वाहन चालक व प्रवासी वर्गाने केली आहे.

- Advertisement -

महामार्गावरून ये -जा करणार्‍या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून चौकाचौकांमध्ये वाहतूक कोंडीमुळे प्रवास करणारे नोकरदार, शेतकरी, महाविद्यालयीन युवक- युवती, शाळकरी मुले यांना वेळेवर पोहोचता येत नाही. दररोज होणार्‍या या वाहतूक कोंडीने अक्षरशा डोकेदुखी निर्माण झाली आहे.वाहतूक कोंडी ज्या वेळेला होत असते त्यावेळेला वाहतूक निरीक्षक मात्र इतर वाहनांना पकडून दंडात्मक कारवाईकडे व्यस्त झालेले दिसत असतात. त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी मोकळी होण्याऐवजी प्रचंड प्रमाणात वाढत असते.

याचबरोबर पंचवटीतील अमृतधामपासून तारवालानगरकडे जाणार्‍या रस्त्यावर गुंजाळ बाबानगर येथील चौकात हिरावाडी कडून येणारी वाहने मार्केटकडे म्हणजेच तारवालानगरकडे आणि तारवालानगर कडून महामार्गाकडे जाणार्‍या वाहनांची या ठिकाणी सतत कोंडी होत असते. या ठिकाणी म्हणजेच परिसरात अनेक शाळा असून शाळांमध्ये सायकलीने जाणारे लहान विद्यार्थी देखील त्रस्त झाले आहेत.

तारवाला नगर या ठिकाणी देखील अनेक वेळा सिग्नल बंद असताना वाहने बेभान धावत असतात. अनेक वेळेला या ठिकाणी अपघात झालेले आहेत.तरीदेखील वाहन चालक भरधाव आपली वाहने नेत असतात. तारवालानगरपासून पेठरोडवरील शरद पवार मार्केटकडे म्हणजेच मखमलाबाद गावाकडे जाणार्‍या वाहनांची गर्दी पेठ रोडवरील मार्केट समोरील चौकामध्ये होत असते. बर्‍याच वेळेला वाहतूक पोलीस याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. मार्केटकडे ये-जा करणारी अवजड वाहने या ठिकाणाहून सारखी जात असतात त्यामुळे दुचाकी व लहान वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे.

बळी मंदिरपासून रासबिहारी मेरी लिंक रोडने दिंडोरी रोडकडे जाणार्‍या रस्त्यावर कळसकरनगर हॉटेल झकास समोर आणि राज स्वीट समोर वाहतूक कोंडी होताना दिसते. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठोस नियोजन करणे गरज आहे. परंतु त्या नियोजनाकडे वाहतूक शाखा दुर्लक्ष करीत असल्याने वाहतूक कोंडीची डोकेदुखी सतत वाढत असून दररोजच्या वाहतूक कोंडीला नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. अनेक लहान मोठे अपघात होत असतात.मोठे अपघात झाल्यानंतर प्रशासन व वाहतूक शाखा खडबडून जागी होते आणि त्याच्यावर उपाययोजना करावयास सुरुवात करते. अपघातापूर्वीच संबंधित चौकाचौकांचे निरीक्षण करून ठिकठिकाणी हम्प तसेच पांढरे पट्टे, गतिरोधक टाकल्यास वाहनांची गती कमी होईल, होणारी वाहतूक थांबेल, वाहतूक कोंडी होणार नाही व अपघातांचे प्रमाण देखील कमी होईल असेही नागरिक व प्रवासी वर्गाने बोलून दाखवले आहे.

अनेक ठिकाणी अवजड वाहनांसाठी रस्ते बंद’ असे फलक लावलेले असताना देखील बिनधास्तपणे अवजड वाहने वाहन चालक घेऊन जाताना दिसतात. या ठिकाणी मवळण रस्ता आहे ,अपघात होण्याची शक्यता आहे,असे फलक लावलेले असताना देखील वाहनांची वेग मर्यादा कमी होत नसल्याने अनेकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. यावर वाहतूक शाखेने वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी वाहतूक कोंडी होणार नाही अपघातांचे प्रमाण वाढणार नाही याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

बंदी असतानाही उड्डाणपुलावर दुचाकी

द्वारकापासून हॉटेल जत्रापर्यंत या वाहतूक कोंडीमुळे अनेक दुचाकी वाहनचालक हे उड्डाण पुलावर ये-जा करणे पसंत करतात. उड्डाण पुलावरून दुचाकी वाहनांना बंदी असून देखील जीव मुठीत धरून उड्डाण पुलावरून येजा करताना दिसत आहेत. पोलीस व्हॅन उड्डाण पुलावर अनेक वेळा उभी असते. उड्डाण पुलाच्या सुरुवातीला अनेक वाहतूक पोलीस देखील या ठिकाणी बंदोबस्तासाठी उभे असतात. त्यांचे लक्ष असून सुद्धा अनेक वेळा दुचाकी वाहन चालक त्यांच्या समोरून आपली वाहने वेगाने उड्डाण पुलावरून अपघाताची भीती न बाळगता वेळेवर कामावर पोहोचणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ये-जा करत असतात.

पंचवटी परिसरातील विविध चौकात वाहतूक कोंडी लक्षात घेता तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. बळी मंदिर, कळसकर नगर, हॉटेल जत्रा तसेच झकास मिसळ हॉटेल समोर होणारी वाहतूक कोंडी केवळ वाहनचालकांना वाहतूक शाखेचे अधिकारी नसल्याने व कोणत्याही प्रकारचा धाक नसल्याने निर्माण होत आहे. वाहतूक शाखेने या बाबीकडे लक्ष द्यावे.

राकेश खैरनार

मुंबई-आग्रा महामार्गावरील विविध ठिकाणी होणार्‍या वाहतूक कोंडीने प्रवासी वर्गाला व नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. यासाठी सर्व ठिकाणी वाहतूक पोलिसांची कायमस्वरूपी नेमणूक करावी व त्यांच्यावर वाहतूक कोंडीवर नियंत्रण आणण्याची जबाबदारी द्यावी.

सुनील सूर्यवंशी

पादचार्‍यांना रस्ता ओलांडणे अवघड

निमाणी बस स्टॅन्डसमोर दुपारी तीन नंतर रात्री उशिरापर्यंत वाहनांची प्रचंड गर्दी होत असल्याने प्रवाशांना स्टँड वर जाणे व स्टॅन्डवरून बाहेर पडणे अवघड झाले आहे. सकाळी शहर पोलीस वाहतूक शाखेचे अनेक अधिकारी व कर्मचारी या ठिकाणी उपस्थित असतात.परंंतु सायंकाळी तीन नंतर रात्री उशिरापर्यंत शहर वाहतूक पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांच्या अनुपस्थितीमुळे या ठिकाणी वाहनांची प्रचंड गर्दी होते.दिंडोरी रोडवरून व पेठ रोडवरून शहराकडे आणि आडगाव नाक्याकडे जाणार्‍या वाहनांची तोबा गर्दी असते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना, ज्येष्ठ नागरिकांना, शाळकरी मुलांना व महाविद्यालयीन युवक युवतींना रस्ता ओलांडणे म्हणजे जीव मुठीत धरून चालणे अशी परिस्थिती या ठिकाणी असते. भडक दरवाजासमोरील रिक्षा स्टॅन्ड त्याचबरोबर वाहतूक बेटा जवळील रिक्षा स्टॅन्ड निमाणीजवळील रिक्षा स्टॅन्ड आणि निमानी बसस्थानकाला लागून भाजीपाला व फळे विक्रेत्यांची दुकाने तसेच दिंडोरी कडून येणार्‍या रस्त्यावर निमाणीच्या कॉर्नरवर बसणारे भाजीपाला विक्रेते त्याचप्रमाणे पेठ रोड करून दिंडोरी रोडकडे जाणार्‍या कॉर्नरवर बसणारे भाजीपाला विक्रेते आणि टॅक्सी स्टँड समोरील वाहनांची गर्दी यामुळे या ठिकाणी वाहनांची तोबा गर्दी होते. प्रवासी वर्गाला आणि पादचारी वर्गाला कसरत करून या ठिकाणी प्रवास करावा लागत आहे. मालेगाव स्टँड कडून दिंडोरी रोडकडे, पेठ रोडकडे आणि निमानी बस स्थानकाकडे जाणार्‍या वाहनांना देखील खूप वेळ थांबावे.

- Advertisment -

ताज्या बातम्या