Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्या31 जानेवारीपूर्वी काम पूर्ण करा अन्यथा...

31 जानेवारीपूर्वी काम पूर्ण करा अन्यथा…

नाशिक । प्रतिनिधी Nashik

गोदावरीच्या तळाचे काँक्रीट काढल्याचा दावा स्मार्ट सिटीच्या अधिकार्‍यांनी केल्याने नदीपात्र कोरडे करुन ते प्रत्यक्ष पहाणीचा निर्णय घेतल्यानंतरही नदीपात्र कोरडे करता न आल्याने गोदाप्रेमी सेवक समितीच्या वतीने नाराजी व्यक्त करण्यात आली. येत्या 31 जानेवारीपूर्वी हे काम पूर्ण करण्याचा आश्वासन स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांनी दिले.

- Advertisement -

गोदावरीच्या विविध प्रश्नांसाठी स्मार्ट सिटीच्या दालनात 27 डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत निळकंठेश्वरच्या पायर्‍या 15 दिवसांत पूर्ण करण्याची वल्गना करणार्‍या अधिकार्‍यांनी प्रत्यक्ष गंगाघाटावर पाहणीत दोन महिन्यांची मुदत मागितली. तर नदीपात्रातील काँक्रीट काढून झाल्याचा दावा केला होता. मात्र ते प्रत्यक्ष पहाण्यासाठी काल नदीपात्र कोरडे करण्याचे ठरल्यानंतरही पात्र कोरडे करु न शकल्याने गोदाप्रेमी सेवक समितीच्या वतीने नाराजी व्यक्त केली. येत्या 31 जानेवारीपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे पुन्हा नव्याने आश्वासन देण्यात आल्याने त्यांच्या कामावर किती विश्वास ठेवायचा, असा प्रश्न गोदाप्रेमींनी उपस्थित केला आहे.

गोदाप्रेमींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमध्ये प्रामुख्याने निळकंठेश्वर मंदिराच्या पायर्‍यांना गतवैभव देणे, देवीच्या सांडव्याची पुनर्स्थापना करणे, नदीच्या पात्रात टाकलेले काँक्रीट पूर्णत: काढून नदीपात्रातील नैसर्गिक झिर्‍यांना मोकळे करणे तसेच निळकंठेश्वर मंदिरालगत काम करताना तुटलेल्या गणेश मंदिर व त्यांच्या मूर्तींची पुनर्स्थापना करण्याच्या मागण्या ठेवलेल्या होत्या.

निळकंठेश्वराच्या पायर्‍यांचे वाहून गेलेले पुरातन दगड पुन्हा शोधण्याची मागणी करण्यात आली होती. याबाबत नदीपात्रातून काढण्यात आलेल्या मलब्यात सापडलेले पायरीचे दगड पुन्हा वापरणे योग्य नसल्याने त्यांना इतरत्र वापरण्याचे स्मार्ट सिटी सीईओ सुमंत मोरे यांनी सांगितले. त्यामुळे हा प्रश्न निकाली निघाल्याने येत्या दोन दिवसांत पायर्‍यांच्या कामाला प्रारंभ करण्याचे आश्वासन सुमंंत मोरे यांनी दिले. गणपतीचे दगडी मंदिर तयार करण्यात आले असून, लवकरच त्या जागेवर स्थापित केले जाणार असल्याचे यावेळी स्मार्ट सिटीने सांगितले.

देवीच्या सांडव्यासाठी गोदावरीप्रेमींद्वारे मिळणारे डिझाईन व स्मार्ट सिटीचे डिझाईन यांच्यात सुवर्णमध्य साधून दगडी सांडवा बांधण्यात येईल, असेही मोरे यांनी सांगितले. नदीपात्र कोरडे करण्यासाठी पाण्याचा प्रवाह रोखण्याबाबत उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगून आज पाणी थांबवण्याचा प्रयत्न केला असतानाही नदीपात्र पूर्ण कोरडे करणे शक्य न झाल्याने आम्ही संपूर्ण काँक्रीट ते काढले असून, ते काँक्रीट काढलेल्याची स्थिती दाखवणे शक्य होत नसल्याचे सुमंत मोरे यांनी सांगितले.

गोदावरी आमची माता

गोदावरी नदी ही आमची माता आहे. स्मार्ट सिटीच्या नावाने तिच्याशी चाललेला खेळ बंद करा. नागरिकांचा संयम सुटत चालला आहे. आठ वर्षेे यासाठी सातत्याने लढा देत आलो आहोत. यापुढे पाठपुरावा करणे कठीण झाले असल्याचा इशारा गोदाप्रेमी सेवक समितीच्या वतीने देवांग जानी, कैलास देशमुख, बाबासाहेब राजवाडे, बबलू परदेशी, नरेंद्र दारणे, चिराग गुप्ता आदीसह उपस्थितांनी दिला.

बाराकुंडांचे काँक्रीट काढलेले नाही. पाच कुंडांचे काँक्रीट काढल्याचे म्हणतात ते कां दाखवलें जात नाही? मनपा स्मार्ट सिटीने एकत्र येत आम्हाला रिझल्ट द्यावा. कारण नको. उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवलंबन होत नाही तर अवमान केला जात आहे. सोबतच आमची फसवणूक होत आहे. मनपा व स्मार्ट सिटी या दोघांवर या दोन गोष्टींच्या गुन्ह्यांमध्ये आम्ही कारवाईचा पाऊल उचलणार आहोत अन्यथा पुढील कारवाईसाठी आम्ही सज्ज झालो आहोत. 31 जानेवारीला गोदावरीचा जन्म दिवस आहे. त्याच्यापूर्वी नाशिककरांना काँक्रीटमुक्त गोदावरीची भेट द्यावी.

– देवांग जानी, गोदाप्रेमी सेवक व याचिकाकर्ता

नदीपात्रातील काँक्रीट 100 टक्के काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. जेवढा शक्य आहे तेवढे पात्र काँक्रीटमुक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. निळकंठेश्वराच्या पायर्‍या, गणपती मंदिर व नदीपात्रातील काँक्रीट काढण्याचे काम 31 जानेवारीपर्यंत सर्व काम पूर्ण करण्याचा निर्धार आहे.

-सुमंत मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी

- Advertisment -

ताज्या बातम्या