Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यालम्पी लसीकरण प्रकरणी तक्रारी प्राप्त; गुन्हे दाखल करणार - डॉ. गर्जे

लम्पी लसीकरण प्रकरणी तक्रारी प्राप्त; गुन्हे दाखल करणार – डॉ. गर्जे

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यात लम्पी आजाराचा (Lumpy disease)संसर्ग वाढत असल्याने पशुपालक त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत पशुपालकांना आधार देणे आवश्यक आहे. मात्र, लसीकरणाच्या नावाखाली जिल्ह्यात खासगी डॉक्टर पशुपालकांकडून मोफत असलेल्या लसीचे सर्रासपणे पैसे उकळत आहेत. याबाबतच्या तक्रारी जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत.

- Advertisement -

जिल्ह्यात लम्पी आजाराचा संसर्ग वाढत असताना वेगाने लसीकरण व्हावे, यासाठी खासगी डॉक्टरांना सहभागी करून घेतले जात आहे. यासाठी प्रत्येकी जनावर तीन रुपये या खासगी डॉक्टरांना शासनाकडून दिले जाणार आहेत. मात्र, खासगी डॉक्टरांकडून शेतकर्‍यांकडे अतिरिक्त पैसे मागितले जात असल्याच्या तक्रारी जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विष्णू गर्जे यांनी या तक्रारींची गंभीर दखल घेतली असून पैसे घेणार्‍यांची चौकशी सुरू केली आहे. दुसरीकडे हे लसीकरण मोफत असून त्यासाठी कोणीही पैसे देऊ नये, असे आवाहन डॉ. गर्जे यांनी केले आहे. पैसे घेताना सापडल्यास त्यांच्यावर थेट गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात एकूण 25,155 जनावरे आहेत. यात 17,699 गाई, 3,996 बैल व 3,460 म्हैशी यांचा समावेश आहे. यातील 160 जनावरांना लम्पीची बाधा झाली आहे. त्यातून 135 जनावरे उपचाराअंती बरी झाली आहेत. आतापर्यंत लम्पीबाधित दोन जनवारांचा मृत्यू झाला आहे.

लम्पीचा मुकाबला करण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात असून विभागाने लसीकरण वाढवले आहे. मात्र, रिक्त जागांची संख्या लक्षात घेता पशुसंवर्धन विभागाकडे अपुरे मनुष्यबळ आहे. यासाठी विभागाने खासगी डॉक्टरांना मदतीसाठी घेतले असून त्यांना एका जनावारांमागे तीन रुपयांचा मोबदला दिला जाणार आहे. असे असताना येवला तालुक्यातील आंबेगावात लसीकरणासाठी आलेल्या डॉक्टरांकडून लसीकरणासाठी प्रत्येकी 20 रुपयांची मागणी झाली.

पैसे दिल्याशिवाय लसीकरण न करण्याची भूमिका यावेळी डॉक्टरांनी घेतली. याबाबतची तक्रार मंगळवारी (दि.27) डॉ. गर्जे यांच्याकडे प्राप्त झाली. त्यानंतर लागलीच डॉ. गर्जे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. यातील दोषींवर कारवाई करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लम्पी लसीकरण मोफत आहे. त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांनी लसीकरण करून घेतल्यानंतर पैसे देऊ नये. पैसे मागितल्यास थेट जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अथवा विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन डॉ. गर्जे यांनी केले आहे.

सव्वादोन लाख लसीकरण पूर्ण

सरसकट लसीकरणाचे आदेश प्राप्त झाल्यानंतर लसीकरणाचा वेग वाढला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 2 लाख 25 हजार जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. लसीकरणासाठी पशुसंवर्धन विभागास सद्यपरिस्थितीत 6 लाख 25 हजार लसींचा साठा उपलब्ध आहे. 244 पशुवैद्यकीय दावखान्यांमध्ये लसीकरण सुरू आहे. 100 टक्के लसीकरण करण्याचे नियोजन विभागाने केले आहे.

– डॉ विष्णू गर्जे,जिल्हा पशुसवंर्धन अधिकारी , जिल्हा परिषद, नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या