Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यामहाराष्ट्राच्या कांद्याशी मध्य प्रदेश, कर्नाटकी कांद्याची स्पर्धा

महाराष्ट्राच्या कांद्याशी मध्य प्रदेश, कर्नाटकी कांद्याची स्पर्धा

नाशिक । विशेष प्रतिनिधी Nashik

कांद्याचे भाव पुन्हा कोसळू ( Falling Onion Rates) लागल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. संतप्त शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. त्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ कृषीतज्ञ डॉ. सतीश भोंडे (Senior agronomist Dr. Satish Bhonde)यांनी कांदा पिकाबाबत महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रातील कांद्याशी आता देशाच्या इतर राज्यांतील कांदा बाजारपेठांमध्ये स्पर्धा करू लागला आहे. त्याचा परिणाम राज्यातील कांदाभाव घसरण्यात झाला आहे. कांदा पिकवण्यात देशात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्राशी आता मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक ही राज्ये स्पर्धा करू लागले आहेत. महाराष्ट्राच्या तुलनेत तेथील कांदा उत्पादकता जास्त असून उत्पादन खर्च कमी आहे. त्यामुळे सध्या मिळणार्‍या दरात कांदा विकणे तेथील शेतकर्‍यांना किफायतशीर ठरत आहे. याउलट परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे, असे डॉ. भोंडे यांनी दैनिक ‘देशदूत’शी बोलताना सांगितले.

सध्या राज्यातील बाजार समित्यांच्या आवारांवर लाल खरीप कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तथापि आवकेच्या प्रमाणात पुरेसा उठाव नसल्याने कांद्याचे भाव कोसळले आहेत. महाराष्ट्राच्या कांद्याशी स्पर्धा करायला मध्य प्रदेश, राजस्थान तसेच कर्नाटकातील कांदा तेथील बाजारपेठांमध्ये दाखल होत आहे. स्थानिक शेतकर्‍यांचा कांदा उपलब्ध असल्याने महाराष्ट्रातील कांद्याच्या मागणीत घसरण झाली आहे.

पूर्वी महाराष्ट्र वगळता इतर राज्यांतील कांदा उत्पादन कमी होते. आता मध्य प्रदेश( Madhyapradesh), राजस्थान(Rajsthan ) व कर्नाटकात ( Karnataka)कांदा पिकाखालील क्षेत्र वाढत आहे. महाराष्ट्राची कांदा पिकाची उत्पादकता सध्यस्थितीत हेक्टरी 18 ते 20 टन आहे. याउलट ‘एनएचबी’च्या ताज्या आकडेवारीनुसार मध्य प्रदेश, कर्नाटकातील कांदा उत्पादकता हेक्टरी 24 ते 25 टन आहे. उत्पादकता जास्त असल्याने तेथील शेतकर्‍यांना कमी भावातसुद्धा कांदा विकणे परवडते. महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना ते परवडत नाही. मशागत, खते, कीड-रोगप्रतिबंधक औषधे, मजुरी, वाहतूक आदीखर्च बराच वाढला आहे. त्यामुळे कांदा पिकवणे खर्चिक ठरत आहे, असे डॉ. भोंडे यांनी सांगितले.

एकीकडे वाढता उत्पादन खर्च आणि दुसरीकडे उत्पादन खर्चाच्या तुलनेत मिळणारा कमी भाव अशा दुहेरी संकटात राज्यातील शेतकरी सापडला आहे. कांद्याला चांगला आणि किफायतशीर भाव हवा असेल तर सरकारच्या भरवशावर न राहता शेतकर्‍यांच्या उत्पादक कंपन्यांनी बाजारपेठांमध्ये उतरणे आवश्यक आहे. कांदा आणि तत्सम शेतमाल विक्रीसाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांनी सरकारकडे विविध राज्यांत जागा मागितल्या पाहिजेत. शेतकर्‍यांच्या कंपन्यांनी थेट विक्री सुरू केली तर कांदा आणि इतर शेतमालाला चांगला भाव मिळू शकेल. त्याचा फायदा थेट शेतकर्‍यांना होईल. देशात शेतमाल वाहतुकीसाठी रेल्वेने ङ्गकिसान रेल्वेफ सुरू केली आहे. त्याचा लाभ व्यापारीवर्ग उठवत आहे. शेतकरी कंपन्यांनासुद्धा या सेवेचा लाभ मिळवता येईल, असे डॉ. भोंडे यांनी नमूद केले.

कांदा उत्पादनाबाबत अजूनही राज्यात योग्य ते नियोजन होताना दिसत नाही. आजकाल बहुतेक शेतकरी कांदा लागवडीकडे आकर्षित झाले आहेत. त्यामुळे कांदा पिकाखालील क्षेत्रात दरवर्षी वाढ होत आहे. गेल्या वर्षी जास्त उत्पादन झाल्याने यंदा कांदा पिकाखालील क्षेत्रात घट होईल, असा अंदाज बांधून शेतकरी कांदा लागवड करतात, पण लागवडीखालील क्षेत्र कमी होण्याऐवजी ते वाढत आहे. उत्पादकता कमी असताना वाढत्या क्षेत्रासोबत लागवड खर्चही वाढला आहे. कांदा उत्पादक शेतकर्‍यांमध्ये याबाबत जागरूकता वाढणे आवश्यक आहे. हवामान बदलाचे पिकांवर विपरीत परिणाम होत आहेत. त्याच्या चढउतारामुळे कांदा पिकावर फुलकिडीचे (थ्रीप्स) प्रमाण वाढले आहे. फुलकिडीमुळे ‘आयरिस येलो स्पॉट’ या नव्या विषाणूचा प्रादुर्भाव रब्बी कांद्यावर होत आहे.

कांदा क्षेत्र मर्यादित ठेवा

कांदा उत्पादनातील नुकसान टाळायचे असेल, उत्पादन खर्च आवाक्यात राहावा असे वाटत असेल तर लागवडीच्या सुरुवातीच्या टप्प्यापासून पिकाच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेतली पाहिजे. कांदा पिकाखालील क्षेत्र वाढवण्याचा अट्टाहास टाळून आपापले क्षेत्र मर्यादित ठेवले पाहिजे. गेल्या वर्षी 340 लाख टन कांदा उत्पादन झाले. नेहमीपेक्षा 19 टक्के जास्त कांदा उत्पादन झाले. प्रमाणाबाहेरील ही उत्पादनवाढच कांदाभाव घसरणीचे कारण ठरत आहे. कांदा उत्पादकांनी याकडे गांभीर्याने पाहावे, असे आवाहनही डॉ. भोंडे यांनी केले आहे.

ठळक मुद्दे

महाराष्ट्राची कांदा उत्पादकता हेक्टरी 18 ते 20 टन. मध्य प्रदेश, कर्नाटकची कांदा उत्पादकता हेक्टरी 24 ते 25 टन.

मशागत, खते, कीड-रोगप्रतिबंधक औषधे, मजुरी, वाहतूक खर्चात वाढ. परिणामी कांदा पिकवणे खर्चिक.

किफायतशीर भावासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांनी बाजारपेठांत उतरावे.

‘किसान रेल्वे’चा लाभ शेतकरी कंपन्यांनी घ्यावा.

फुलकिडीमुळे ‘आयरिस येलो स्पॉट’ विषाणूचे आव्हान.

- Advertisment -

ताज्या बातम्या