नाशिक ।प्रतिनिधी

करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यार्थ्यांना वेळापत्रकानुसार प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा देणे शक्य न झाल्यास त्या परीक्षा लेखी परीक्षेनंतर घेण्यात याव्यात, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.पुन्हा घेण्यात येणार्या या परीक्षांसाठी कोणतेही वेगळे शुल्क आकारण्यात येऊ नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढत असलेल्या भागातील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी व बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले. मात्र, वाढत असलेला करोनाचा उद्रेक याचबरोबर स्थानिक प्रशासनांकडून येणारे निर्बंध लक्षात घेता या परीक्षांचे नियोजन कसे करावे, असा प्रश्न मुख्याध्यापकांना पडला होता.

या बैठकीमध्ये पालक संघटनांच्या प्रतिनिधींनी दहावी व बारावीच्या परीक्षांमधील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित या पेपरमध्ये पुरेसे अंतर ठेवावे. प्रश्नसंचासंदर्भातील अडचणी, कंटेन्टमेंट झोन, लॉकडाउन अथवा करोना लागण इत्यादी कारणांमुळे ज्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार घेणे शक्य होणार नाही त्यांच्याबाबत शासनाने विचार करावा. तसेच यासाठी वेगळे शुल्क आकारले जाऊ नये, अशी मागणी पालक संघटनांनी केली.

विद्यार्थ्यांना प्रश्नसंच उपलब्ध व्हावेत यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून अथक मेहनत घेण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना प्रश्नसंच उपलब्ध करून देण्याच्या तसेच सह्याद्री वाहिनीवरून होणार्या तासिका वाढवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

या बैठकीला शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर टेमकर आणि उपसंचालक विकास गरड उपस्थित होते.