<p>नाशिक | प्रतिनिधी</p><p>शासनाच्या लोकसेवा हक्क अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नाशिकमध्ये जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जानेवारी ते सप्टेंबर २०२० या कालावधीत एकूण १० लाख ३९ हजार ४०४ सेवा पुरविल्या आहेत. याची दखल घेऊन महाराष्ट्र लाेक सेवा हक्क कायदा विभागाचे राज्य मुख्य लाेकसेवा हक्क आयुक्त स्वाधिन क्षत्रिय यांनी मांढरे यांचे विशेष अभिनंदन केले आहे. तसे पत्र त्यांना पाठविले आहे.</p><p>क्षत्रिय यांनी लिहिलेल्या पत्रात लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ च्या उद्दीष्टानुसार नागरीकांना पारदर्शक, कार्यक्षम व समयोचित सेवा देण्यासंदर्भात सूरज मांढरे यांनी राबविलेला उपक्रम नाविन्यपूर्ण आणि कौतुकास्पद आहे. वस्तुत: कराेना संसर्गाच्या आव्हानात्मक काळात नाशिक जिल्ह्यात १० लाखापेक्षा अधिक सेवा दिल्या गेल्या हे लोकाभिमूख कामकाजाचे उदाहरण आहे. राबविलेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाबाबत अभिनंदन. या कायद्याबाबत यापुढेही असेच उल्लेखनिय कामकाज करुन त्याबाबत आयोगास अवगत करावे, असे त्यांनी कळविले आहे. जिल्हा प्रशासनाने महसूल विभागाशी निगडीत ८१ सेवा नव्याने अधिसूचित करुन तहसिल कार्यालय, उपविभागीय कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व शाखांमार्फत दि. २६ जानेवारी २०२० पासून पुरविल्या आहेत. तसेच या सर्व सेवा ऑनलाईन देण्याकरीता कार्यवाही सुरु आहे.</p>