Thursday, May 9, 2024
Homeमुख्य बातम्यागोेदावरी, नंदिनीचे प्रदूषण रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज

गोेदावरी, नंदिनीचे प्रदूषण रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज

नाशिक । देशदूत टीम Nashik / Team Deshdoot

नाशिक शहर तसेच लगतच्या भागांमध्ये गोदावरी ( Godavari River ) व नंदिनी ( Nandini River ) या दोनही नद्यांमध्ये थेट मलजल व दूषित पाणी (Contaminated water) सोडले जात आहे. यामुळे या दोनही पवित्र नद्यांना नाल्याचे स्वरूप प्राप्त होताना दिसत आहे. याबाबत प्रशासनाने परस्परांवर जबाबदारी ढकलताना कठोर कारवाई करण्याची मागणी सातत्याने होत असली तरी पाहिजे तशी उपाययोजना होताना प्रत्यक्षात दिसून येत नाही. यासाठी न्यायालयापाठोपाठ राज्य शासनाने याबाबत कठोर भूमिका विषद केली असली तरी राज्य शासनाबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संयुक्त माध्यमातून ठोस कार्यवाही होण्याची गरज असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

- Advertisement -

गोदा झाली मैली

गोदावरी नदीला जोडलेल्या नैसर्गिक नाल्यांमध्ये थेट गटारीचे पाणी सोडले जात असल्याने गोदा प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. मल्हारखाण, चोपडा नाला, जोशीवाडा नाला, निर्मला कॉन्व्हेंट नाला, आसाराम बापू आश्रमातील नाला, आनंदवल्ली नाला, चिखली नाला, सोमेश्वर नाला, बारदान फाटा जवळील नाला, गंगापूरगाव नाला, गांधारवाडी नाला, कुसुमाग्रज उद्यानालगतचा नाला, रामवाडी लेंडी नाला, सरस्वती नाला, यामुळे गोदावरीला मिळणार्‍या 19 नैसर्गिक नाल्यांमध्ये गटारीचे पाणी सोडले जाऊ नये, अशी मागणी निरी आणि महापालिका यांच्या संयुक्त बैठकीत पर्यायवरणप्रेमींनी केली. त्यानुसार काम महापालिकेने सुरू केल्याचा दावाही केला जात असला तरी पावसाळ्यात त्यातील सत्य समोर येणार आहे.

पर्यावरणप्रेमींनी गोदावरी नदीला मिळणार्‍या नैसर्गिक नाल्यांमध्ये थेट गटारीचे पाणी सोडले जाते. त्यामुळे गटारीचे पाणी हे नाल्यांद्वारे थेट नदीपात्रात मिसळून नदीचे प्रदूषण होत आहे. त्यामुळे नैसर्गिक नाल्यांना मिळणारे गटारीचे पाणी तातडीने बंद करण्याची मागणी होते. महापालिकेमार्फत शहरातील गटारींचे पाणी स्वतंत्र मलवाहिकाद्वारे एसटीबी प्लांटपर्यंत आणण्याचे नियोजन करत आहे. त्यासाठी 80 कोटींची तरतूद केली. यात नैसर्गिक नाल्यांमध्ये सोडण्यात येणारे गटारीचे पाणी हे स्वतंत्रपणे मलवाहिकाद्वारे वाहून जाणार आहे. त्यामुळे गटारींचे हे पाणी नैसर्गिक नाल्यांमध्ये जाणार नसल्याने गोदावरीच्या प्रदूषणाला आळा बसणार आहे. त्याची नाशिककरांना प्रतीक्षा आहे.

गोदावरी प्रदूषणातही या नैसर्गिक नाल्याचां मोठा हातभार आहे. यात नवश्या गणपती मंदिरालगत उभारलेल्या नाल्याला ड्रेनेज यंत्रणेत जोडण्याची व्यवस्थाच नसल्याने थेट पाणी नदीपात्रात सोडले जात असल्याचे चित्र आहे. तसेच बजरंगवाडी लगतचा नाला थेट नदीपात्रात जातो. या नाल्यातून या भागातील मलजल थेट महादेव मंदिराच्या मागच्या बाजूने गोदावरीत मिसळत आहे. यासह गंगापूर गाव ते नवश्या गणपती दरम्यान दोन ते तीन नैसर्गिक नाले हे गोदावरीत मिसळत असल्याने या माध्यमातून गोदावरी प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यावर उपाययोजना करण्याची मागणी सर्वच स्तरावरुन होत आहे.

नंदिनीची पुन्हा नासर्डी

स्वामी समर्थांनी ज्या नदीच्या पावित्र्याचे गोडवे लिहिलेले आहेत. नासर्डीचे नंदिनी नामकरण केले होते. त्या नंदिनीला पुन्हा बकाल करण्याचे काम शहरीकरणानंतर प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराने केल्याचे दिसून येत आहे. नासर्डी नदीला खर्‍या अर्थाने गटारीकरणाला पिंपळगाव बहुला येथून प्रारंभ होतो. त्याठिकाणापासूनच ड्रेनेजचे चेंबर हे नासर्डी नदीच्या काठाने पुढे नेण्यात आलेले आहेत. अनेक ठिकाणावर या चेंबरमधून थेट घाण पाणी नासर्डीतून वाहताना दिसून येत आहे. पिंपळगाव सातपूर कॉलनी, महादेववाडी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चेंबर फुटलेले दिसून येत आहेत. या नदीला अनेक नैसर्गिक नाले जोडले गेलेले आहेत. या नाल्यांमधून नागरिकांच्या घरगुती वापराचे पाणी मलजल सर्रासपणे नाल्यातून वाहताना दिसून येत आहे. या प्रकाराला कोणताच पायबंद नसल्याने नदी प्रदूषणात सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे.

नाशिक शहरातील प्रमुख नद्यांपैकी एक असलेली नंदिनी. नदीला सध्या नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मोठा प्रवास करून येणार्‍या नदीत मोठ्या प्रमाणात व अनेक ठिकाणी गटारीचे पाणी व नाल्याचे पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे खळखळ वाहणार्‍या नदीला सध्या नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मध्यंतरी नाशिक महापालिकेचे महापौर असताना सतीश कुलकर्णी यांनी नदी स्वच्छ करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली होती.

यासाठी विविध संस्था संघटनांनी देखील पाठिंबा दिला होता तर महापालिकेच्या वतीने कोट्यवधी रुपये खर्च करण्याची तयारी देखील यासाठी सुरू झाली होती. मात्र, सत्ता गेल्यानंतर व सध्या प्रशासक राजवट सुरू झाल्यामुळे महापालिका प्रशासनाचे या विशेष मोहिमेकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. मुंबई नाक्यापासून तर पुणे हायवेपर्यंत या नंदिनी नदीत मोठ्या प्रमाणात घाण व कचरा टाकण्यात येतो. तसेच, विविध भागांतील गटारींचे पाणी व नाल्यांचे पाणी यामध्ये सोडण्यात येत असल्यामुळे त्यातून सतत दुर्गंधी पसरत असते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे.

शहरातील इतर भागांप्रमाणे नवीन नाशिक भागातील नद्यांमध्ये गटारीचे पाणी सोडण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. येथील आयटीआय पुलाखाली ड्रेनेजचे पाणी नंदिनी नदीत सोडले जाते, त्याचप्रमाणे उंटवाडी पुलाखाली देखील अशीच परिस्थिती आहे. हेडगेवारनगर अमरधाममधून निघालेल्या नाल्यातून नंदिनी नदीत पाणी सोडले जात आहे.

नंदिनी नदी नवीन नाशिकमध्ये प्रवेश करतांना आयटीआय पुलालगत सांडपाणी सोडले जात आहे, उंटवाडी गावानजीक असलेल्या पुलालगत सांडपाणी सोडण्यासाठी मोठी पाइपलाइनीतून ड्रेनेजचे पाणी नदीत सोडले जाते. तर हेडगेवारनगर मधून अमरधाममधून नालीचे पाणी नंदिनी नदीत सोडण्यात येते. नवीन नाशकातील अंतर्गत नाल्यांमध्ये स्थानिक नागरिकांनी कचरा टाकल्याने पुढे तो कचरा गोदावरी नदीत मिश्रित होतो. नंदिनी नदीमध्ये ड्रेनेजचे सांडपाणी वाहून जाण्याकरिता करण्यात आलेले चेंबर बर्‍याच ठिकाणी फुटले असून त्याच्यातील सांडपाणी प्रत्यक्षरित्या नंदिनी नदीत मिश्रित होतांना दिसते. या गंभीर बाबीकडे प्रशासन कधी लक्ष देणार असा सवाल परिसरातील नागरिक, तसेच पर्यावरणप्रेमी करतात. तरी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या