
मुंबई:
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या मंगळवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. या भेटीत मराठा आरक्षणावर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे मोदी-ठाकरे यांच्या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर नवी दिल्लीत ही पहिलीच भेट असणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांची भेट मिळावी म्हणून पंतप्रधान कार्यालयाला विनंती केली होती. पंतप्रधान कार्यालयाने ही विनंती मान्य केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांच्याशी मराठा आरक्षणावर चर्चा करतील. यावेळी महाराष्ट्रातील कोरोना संसर्ग परिस्थिती, लसीकरण, GST परतावा या संदर्भात महत्वाची चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मराठा समाजाचे या भेटीकडे लक्ष
पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यामध्ये उद्या मराठा आरक्षणावर चर्चा होणार आहे. या भेटीत केंद्र सरकारने काय केल्यास मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा होऊ शकतो, यावर चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. तसेच घटनादुरुस्ती आणि मागासवर्ग आयोगाच्या अनुषंगानेही या भेटीत चर्चा करण्यात होणार आहे. यामुळे संपूर्ण मराठा समाजासह राज्याचे लक्ष लागलं आहे.