मुख्यमंत्र्यांच्या विधानामुळे राज्यातील राजकारण बदलाची नांदी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

औरंगाबाद

औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray)आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (raosaheb danve)एकाच व्यासपीठावर होते. यावेळी मुख्यमंत्री ठाकरेंनी केलेल्या एका विधानानं उपस्थितांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुख्यमंत्री ठाकरे यांनी भविष्यात भाजपासोबतच्या (bjp)युतीबाबतचं सूचक विधानच केल्याचं औरंगाबादमध्ये पाहायला मिळत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
राज्यात भाजपला मिळणार नवीन साथीदार

मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या निमित्ताने आज औरंगाबादमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील या कार्यक्रमांना उपस्थित आहेत. आज औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या एका विधानावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगू लागली आहे. भविष्यात शिवसेना आणि भाजपा एकत्र येणार असल्याची चर्चा यावरून सुरू झाली आहे.

मुख्यमंत्र्यांनी भाषणाची सुरुवात करताना व्यासपीठावरच्या उपस्थित मान्यवरांना संबोधताना आजी-माजी सहकाऱ्यांचा उल्लेख केला. मात्र, यावेळी मागे बघून त्यांनी भावी सहकारी म्हणून देखील संदर्भ दिला. त्यामुळे नेमका मुख्यमंत्र्यांचा रोख कुणाकडे आहे? याविषयी चर्चा सुरू झाली. “व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे आजी-माझी आणि एकत्र आले तर भावी सहकारी”, असा उल्लेख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. भाजप नेते रावसाहेब दानवे यांना उद्देशून मुख्यमंत्र्यांनी एकत्रित आले तर भावी सहकारी असा उल्लेख केला. इतकंच नाही तर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा भाजपच्या गोटात आनंद होईल असं वक्तव्य केलं. कारण रावसाहेब दानवे यांनी नागपूर-मुंबई बुलेट ट्रेनसाठी पाठिशी राहण्याची विनंती केली. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, माझ्या राज्याच्या राजधानी आणि उपराजधानी जोडणारा लोहमार्ग मुंबई नागपूर बुलेट ट्रेन होणार असेल तर रावसाहेब मी तुम्हाला शब्द देतो, मी तुमच्यासोबत आहे.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?

पिंपरी चिंचवड जवळील देहूगावमधील एका खाजगी कार्यक्रमात मंचावरुन सूत्रसंचालकाने माजी मंत्री चंद्रकांत पाटील (chandrakant patil)असा उल्लेख केला. सूत्रसंचालकाने दोन-तीनवेळा चंद्रकांत पाटील यांना माजी मंत्री असं संबोधलं. तेव्हा चंद्रकांत पाटील यांनी मागे वळून, माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसात कळेल, असं म्हणत राज्याच्या राजकारणात तीन दिवसांत संभाव्य भूकंप होणार असल्याचे संकेत दिले.

प्रविण दरेकर म्हणतात, “हा इशारा असावा”

मुख्यमंत्र्यांच्या विधानावर प्रविण दरेकर (pravin darekar)म्हणाले “या विधानावरून तर्क करणं योग्य नाही. काल चंद्रकांत पाटलांनी जे वक्तव्य केलं, त्यावर उद्धव ठाकरेंनी केलेली ही मिश्किल टिप्पणी आहे. त्यातून आलेलं हे विधान मला वाटतंय. ते जरी गांभीर्याने घ्यायचं झालं, तर उद्या भाजपासोबत जायचं झालं, तर माझी तयारी आहे, असं त्यांना म्हणायचं असावं. दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने कुरघोड्यांचं राजकारण करू नये, मला भाजपासोबत जाण्याचा पर्याय खुला आहे, हा संदेश देण्याचा त्यांचा प्रयत्न असावा”

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com