मुंबई:

राज्यातील विविध व्यापारी संघटनाच्या पदाधिकारी, प्रतिनिधींशी मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. राज्यात आलेली कोरोनाची दुसरी लाट त्सुनामी सारखी असून एप्रिल अखरेपर्यंत राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या १२ लाखांवर जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, रस्त्यावर उतरण्याची भाषा करू नका. हा लढा सरकारशी नाही. विषाणूशी लढा आहे. तुम्ही महाराष्ट्राचे भूमीपूत्र आहात. तुमचे नुकसान होऊ देणार नाही. कुणाच्याही चिथावणीला बळी पडू नका. संकटाच्या काळातच शत्रू आणि मित्र कोण यांची ओळख होते. हे समजून घ्या. न डगमगता यातून बाहेर पडायचे आहे. कोरोनावर मात करायची आहे, हे लक्षात घ्या.

खरंतर, दुकाने २४ तास उघडी ठेवा असे आवाहनही केले होते. जेणेकरून गर्दी कमी होईल. आताही हेतू दुकाने बंद करणे हा नाही. तर गर्दी टाळणे हा आहे. यापूर्वी आपण सामाजिक अंतराचे चौकोन आखले होते. त्यातून परिश्रमाने, मेहनतीने पहिल्या लाटेवर मात केले होते. यात धारावी पॅटर्नचे जगभर कौतूक केले होते. पण आता परिस्थितीच विचित्र झाली आहे.

यावेळी झालेल्या चर्चेमध्ये विविध व्यापारी संघटनांचे पदाधिकारी, प्रतिनिधी वीरेन शहा, बी. सी. भरतीया, जितेंद्र शहा, विनेश मेहता, ललित गांधी, मोहन गुरनानी यांनी म्हणणे मांडले. या सर्वांनी व्यापाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले. बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड, राज्य टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी आदी उपस्थित होते.