राज्यात 15 जूनपर्यंत निर्बंध कायम

राज्यात 15 जूनपर्यंत निर्बंध कायम

मुंबई | Mumbai

करोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात 15 जूनपर्यंत निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला.

मुख्यमंत्री म्हणाले, जी जनता आपल्यावर प्रेम करते त्यांच्यावर निर्बंध लादण्याचं कटू काम मला नाईलाजानं करावं लागत आहे. यावेळच्या कोरोनाबाधितांच्या सर्वोच्च संख्येचं शिखर सणासुदीपूर्वीच गाठलं आहे. गेल्या वेळी ते सणासुदीनंतर गाठलं होतं. म्हणावं तितकी संख्या अद्याप खाली आलेली नाही. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 92 टक्क्यांवर आले आहे ही दिलायासादायक बाब आहे, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केलं. यावेळी आपण कडक निर्बंध लावले आहेत. लॉकडाऊन केलेला नाही. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढताना दिसतंय. शहरी भागात संख्या कमी होतेय तर ग्रामीण भागात संख्या हलकी वाढताना दिसत आहे,

तिसरी लाट ही आपल्या वागणुकीवर अवलंबून आहे. गेल्या लाटेतील विषाणू आणि यावेळी आलेल्या लाटेतील विषाणूमध्ये फरक आहे. संसर्गाचं प्रमाण वाढवण्याचं प्रमाण नव्या विषाणूमध्ये अधिक आहे. तसंच रुग्णांना बरं होण्यासही वेळ लागत आहे. रुग्णसंख्या गेल्या वेळच्या तुलनेत अधिक आहे.

कोरोनाच्या कालावधीत आपण अन्न सुरक्षा योजनेमध्ये 2 लाख मेट्रिक टन अन्नधान्याचं वाटप केलंय. तर शिवभोजन योजनेचाही 54-55 लाख लोकांना फायदा झाला आहे. नोंदणीकृत कामगारांना 154 कोटी रूपयांचा निधी खात्यात जमा केला आहे. फेरीवाले, घरकाम करणार्‍यांसाठी, आदिवासींसाठी काही लाख रूपयांचा निधी जमा केल्याची माहितीही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली.

लसीकरणाचा वेग वाढवणार

45 च्या वरील नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी केंद्रानं घेतली आहे. तर त्या खालच्या वयोगटातील लोकांच्या लसीकरणाची जबाबदारी राज्याची आहे. एकरकमी लसीचे पैसे देण्याचीही आपली तयारी आहे. आपण चोवीस तास लसीकरण करू. आपली क्षमता आहे. परंतु त्याला मर्यादा आहे. लसीची उत्पादन क्षमता तितकी झालेली नाही. जून महिन्यापासून लसीचा पुरवठा सुरळीत होईल असं सांगण्यात आलं होतं. जशा लसी येतील त्याप्रमाणात लसीकरणाचा वेगही वाढवणार आहोत. सव्वादोन कोटी नागरिकांना आपण लसीकरण केलं आहे, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. लवकरच 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.