मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा दिल्ली दौऱ्यावर

एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे

मुंबई । Mumbai

राज्यात शिंदे - फडणवीस सरकार (Shinde - Fadnavis Government) स्थापन होऊन २७ दिवस उलटले आहे. पंरतु अद्यापही मंत्रिमंडळ विस्ताराला (Cabinet expansion) कोणताच मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे इच्छुकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. तसेच येत्या २९ किंवा ३० तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे आज रात्री पुन्हा दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे...

मंत्रिपदासाठी भाजप आणि शिंदे गटामध्ये (BJP and Shinde group) जोरदार रस्सीखेच सुरु असल्याने मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत भेट घेण्याची शक्यता आहे. तसेच १ ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेच्या (Disqualification) सुनावणी संदर्भात चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ विधीतज्ञांची शिंदे भेट घेणार असल्याचे समजते.

तसेच शिंदे - फडणवीस मंत्रिमंडळात भाजपला २९ तर शिंदे गटाला १३ मंत्रिपद हवी असल्याची माहिती मिळाली आहे. तर शिंदे गटामध्ये ४० बंडखोर आणि १० अपक्ष आमदार असल्याने ६ आमदारांमागे एक मंत्रिपद मिळावे अशी अट शिंदे गटाकडून घालण्यात आली असून एकूण १९ मंत्रिपद आपल्या वाट्याला यायला हवीत, अशी त्यांची मागणी आहे.

दरम्यान, मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यापासून शिंदेंचा हा एकाच महिन्यात चौथा दिल्ली दौरा असणार आहे. त्यामुळे या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. तसेच राज्यात शिंदे - फडणवीस सरकार स्थापन झाले असले तरी मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडल्याने विरोधकांकडून सरकारवर सातत्याने टीकेचे बाण सोडण्यात येत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com