
मुंबई । Mumbai
राज्यात ठाकरे सरकार (Thackeray Government) कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या (BJP) पाठींब्याने सरकार स्थापन केले. या सरकारमध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ३० जून रोजी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पंरतु सत्ता स्थापन करून वीस दिवस झाल्यानंतरही राज्यात (state) नवे मंत्रिमंडळ अस्तित्वात आलेले नाही. त्यामुळे विरोधकांकडून सातत्याने टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या दिल्ली दौऱ्यावर (Delhi tour) जाणार असल्याची माहिती समोर आली आहे...
मिळालेल्या माहितीनुसार, या दिल्ली दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपशासित राज्याचे मुख्यमंत्री म्हणून मावळत्या राष्ट्रपतींच्या समारोपाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे समजते. तसेच या दौऱ्यात राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत (Cabinet expansion) देखील चर्चा होण्याची शक्यता आहे. तर मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही दिल्लीला जाणार आहेत.
दरम्यान, याअगोदर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहिल्यांदा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला गेले होते. यावेळी त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President RamNath Kovind) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्यासह भाजपच्या इतर नेत्यांची भेट घेतली होती. त्यानंतर शिंदे ओबीसी आरक्षणाविषयी (OBC reservation) चर्चा करण्यासाठी देशाचे महाधिवक्ता तुषार मेहता (Advocate General Tushar Mehta) यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला गेले होते. या दौऱ्यावेळी शिवसेनेच्या (Shivsena) १२ खासदारांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांना पाठींबा दर्शविला होता. त्यानंतर त्यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली होती.