
मुंबई | Mumbai
राज्यातील एकूण २३५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका (Gram Panchayat Elections) काही दिवसांपूर्वी जाहीर झाल्या होत्या. त्यानंतर २९३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. यानंतर उर्वरित ग्रामपंचायतींसाठी काल निवडणूक प्रक्रिया पार पडली होती. त्यानंतर आज या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये आत्तापर्यंत १२९८ जागांवर महायुतीने (Mahayuti) दमदार विजय मिळवला आहे. तर ५१७ जागा महाविकास आघाडीला (Mahavikas Aaghadi) मिळाल्या आहेत. तसेच ३४५ जागा या दोन्ही आघाड्यांव्यतिरिक्त इतर पक्षांना मिळाल्या आहेत. एकूणच या निवडणुकांमध्ये महायुती सुसाट निघाली असून महाविकास आघाडीची पिछेहाट झाली आहे. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली असून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) निशाणा साधला आहे...
यावेळी बोलतांना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, "ग्रामपंचायत निवडणुकीत महायुतीला मोठ्या प्रमाणात कौल मिळाला असून मी मतदारांचे आभार मानतो. महाविकास आघाडीने थांबवलेल्या प्रकल्पांना आम्ही चालना देण्याचे काम केले आहे. सर्वांना न्याय देण्याचा काम आमच्या सरकारने केले. शासन आपल्या दारी खरोखर लोकांपर्यंत पोहोचले आहे. आमचे प्रतिनिधी लोकांपर्यंत पोहोचले म्हणून हा निकाल आपण आता पाहतो आहोत. टोमणे, आरोप यावर वर्ष घालवले आणि एकही दिवस असा सोडला नाही, हे लोकांनी नाकारले. ज्यांनी मतदारांची प्रतारणा केली त्याला मतदारांनी घरी बसवले. आमची जबाबदारी वाढली असून आम्ही आणखी काम करू आणि आणखी उद्योग आणू," असे मुख्यमंत्री एकनाथ (CM Eknath Shinde) शिंदे यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की, सर्व समाजाने पाठबळ दिले, "आशीर्वाद दिला म्हणून हे शक्य झाले. घरी बसून राज्य चालवता येत नाही हे लोकांनी दाखवून दिले आहे. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकांमध्ये महायुतीचा असाच विजय होत राहिलं. आता लोकसभेला ४५ पेक्षा जास्त जागा आम्ही घेऊ आणि मोदींचे हात अजून बळकट करू, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले. तसेच मी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री म्हणून आपापल्यापरीने लोकाभिमुख काम करण्याचा, जनतेला न्याय देण्याच काम केले आहे," असेही एकनाथ शिंदे म्हणाले.