Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यामुख्यमंत्र्यांचा 'त्या' वक्तव्यावरून उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, आम्ही...

मुख्यमंत्र्यांचा ‘त्या’ वक्तव्यावरून उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, आम्ही…

नागपूर | Nagpur

राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा (winter session) आज शेवटचा दिवस असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी विधानसभेत भाषण करतांना विरोधकांच्या आरोपांना आपल्या खास शैलीत प्रत्युत्तर दिले. तसेच ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर देखील त्यांनी निशाणा साधला आहे…

- Advertisement -

यावेळी ते म्हणाले की, आम्ही अनेक चांगल्या गोष्टी केल्या त्याचे कौतुक विरोधकांनी करायला हवे होते. पण तसे झाले नाही. आज करोना जपान आणि चीनमध्ये आहे. मी खरंच सांगतो सरकार बदलले नसते तर इथे अधिवेशन झाले नसतं. अजित पवारही (Ajit Pawar) या गोष्टीला नकार देणार नाहीत. गेल्या अडीच वर्षात करोनाच्या (Corona) स्थितीत राज्य नैराश्याच्या गर्तेत गेले होते. आम्ही आल्यानंतर राज्याला चालना देण्याचे काम केले असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले की, हेलिकॉप्टरने शेतात जाणारा मुख्यमंत्री दाखवा आणि एक लाख रूपये मिळवा असा टोमणा मला मारण्यात आला होता. मग मी म्हणतो अडीच वर्षे घराबाहेर न पडणारा मुख्यमंत्री दाखवा आणि बक्षीस मिळवा. लोकांचे हे बक्षीस वाचावे म्हणून आम्ही मुख्यमंत्रीच बदलला, असेही शिंदे म्हणाले. तर महाराष्ट्राबाहेर गेलेल्या उद्योगांबाबत बोलतांना ते म्हणाले की, मी पंतप्रधान यांच्याशी बोललो त्यावेळी ते म्हणाले की असे उद्योग जात नसतात. त्यांना काय माहीत की सरकार बदलणार आहे. बाकीचे इंटरेस्ट ठेवले तर कोण येणार इथे? ७० हजार कोटी रुपयांचे प्रकल्प मंजूर केले. त्यापैकी ४० हजार कोटींचे प्रकल्प विदर्भात आहेत असेही त्यांनी सांगितले.

तसेच पुढे ते म्हणाले की, नागपूरातील (Nagpur) श्रद्धास्थळांना आम्ही काल भेट दिली. त्याबाबत काही नेत्यांनी काय म्हटले हे सगळ्यांनी ऐकले. त्यातही राजकारण करण्याची संधी सोडली नाही. ज्या प्रबोधनकारांनी कर्मकांडावर सातत्याने प्रहार केले आणि त्यांचेच वारस म्हणवणारे लिंबू फिरवण्याची भाषा करु लागले. आम्ही वर्षा बंगल्यावर फार नंतर गेलो आणि तिथे काय काय आहे बघा असे म्हटले. तेव्हा पाटीभर लिंबू सापडले. त्यामध्ये सगळं होते. लिंबू टिंबूची भाषा करणाऱ्यांनी बाळासाहेबांच्या विचारांसोबत प्रबोधकारांच्या विचारांनाही तिलांजली दिली. तुम्ही दुसऱ्यावर टीका करताना स्वतःचे आत्मपरीक्षण करा. यात चूक कोणाची हे स्वतःला विचारा, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

- Advertisment -

ताज्या बातम्या