
मुंबई | Mumbai
मागील चार दिवसांपासून एमपीएससीच्या (MPSC) विद्यार्थ्यांचे (Students) पुण्यात आंदोलन (Agitation) सुरू आहे. एमपीएससीचा नवीन पॅटर्न २०२५ पासून लागू करावा, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.
दरम्यान, यासंदर्भात काल माध्यमांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी लोकसेवा आयोग बोलण्याऐवजी निवडणूक आयोग असा उल्लेख केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. या विधानावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, एमपीएससीच्या प्रश्नावर आम्ही तोडगा काढतोय याबाबत मुलांनाही बोललो आहे. तसेच माध्यमांशी बोलताना माझ्याकडून एमपीएससीचा विषय सुरू असताना निवडणूक आयोग हे अनावधानाने शब्द निघाले आहेत. सध्या निवडणूक आयोग (Election Commission) कोर्ट या गोष्टी जोरात चालू असल्यामुळे असे चुकून शब्द केल्याची कबुली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिली.
पुढे ते म्हणाले की, काही लोकांना आता निवडणूक आयोगाची एलर्जी झाली आहे. त्यातून मला ट्रोल करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, आम्ही प्रश्न सोडवतो एमपीएससी प्रश्नावर राजकारण सुरू आहे. आम्हाला राजकारण करायचं नाही आम्ही प्रश्न सोडवणारे असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले.
काय म्हणाले होते मुख्यमंत्री शिंदे?
माध्यमांसोबत बोलत असताना मुख्यमंत्री म्हणाले होते की, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसोबत मी स्वतः बोललो. जी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली, तिच भूमिका सरकारची देखील आहे. ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह या दोन पद्धतीबाबत काही सूचना आल्या आहेत. २०२५ पासून जी नवी पद्धत सुरु करण्यात येणार होती, त्याबाबत आम्ही निवडणूक आयोगाला पत्र दिले असून त्यांना कळवले आहे.