
मुंबई | Mumbai
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या आक्षेपार्ह पोस्टवरून कोल्हापुरातील वातावरण तापलं आहे. कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनांनी प्रचंड मोर्चा काढून या घटनेचा निषेध केला. यावेळी हजारो हिंदुत्ववादी कार्यकर्ते जमले होते. या आक्रमक कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. त्यामुळे पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली. त्यामुळे वातावरण अधिकच तापलं आहे. जमाव ऐकत नव्हता म्हणून पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या आहेत. कोल्हापुरात तणाव निर्माण झालेला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरातील जनतेला शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे.
कोल्हापूरमधील घटनेवर बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, 'राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सगळ्यांचे सहकार्य आवश्यक आहे. राज्य सरकार सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेणारे सरकार आहे. कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम गृह विभागाचे आहे. मी संबंधित अधिकाऱ्यांशी वैयक्तिकरित्या बोलतोय, ते माझ्या संपर्कात आहेत. गृहमंत्रीही स्वतः अधिकाऱ्यांशी बोलत आहेत. कुणीही कायदा हातात घेऊ नये. कायदा हातात घेणाऱ्याला पाठिशी घातले जाणार नाही,' असा इशारा मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.
ते पुढे म्हणाले की, 'राज्यात कायदा सुवव्यवस्था अबाधित ठेवण्याचे काम सरकारचे आहे. सगळ्या नागरिकांनाही कायदा राखण्याचे आवाहन करतो. सगळ्यांनी सहकार्य करावे. मी सातत्याने संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्कात आहे. कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही, याची काळजी गृह विभाग घेत आहे. स्वतः गृहमंत्रीदेखील या प्रकरणात जातीने लक्ष घालून आहेत. कायदा मोडणाऱ्याला पाठिशी घातले जाणार नाही,' असंही ते म्हणाले.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी देखील कोल्हापुरातील परिस्थितीवर भाष्य केलं. 'देवेंद्र फडणवीस म्हणाले, ' औरंगजेबाची भलावण करणाऱ्यांना महाराष्ट्रात माफी नाहीच. पोलिस सुद्धा कारवाई करतच आहे. त्याचवेळी जनतेने सुद्धा शांतता पाळावी. कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही. ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे'. दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गृहविभागाला दिलेल्या आहेत.