परीक्षांबाबत आज मुख्यमंत्री-शिक्षणमंत्र्यांची चर्चा?

परीक्षांबाबत आज मुख्यमंत्री-शिक्षणमंत्र्यांची चर्चा?

मुंबई । वृत्तसंस्था

राज्यातील दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत येत्या एक-दोन दिवसात मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा होणार आहे. उच्च न्यायालयाने उपस्थित केलेले प्रश्न आणि केंद्र सरकारची परीक्षांबाबतची भूमिका याबाबत मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत चर्चा केली जाईल. त्यावेळी परीक्षांच्या मुद्यांवर सविस्तर विश्लेषण होईल. मुख्यमंत्र्यांनी आज सोमवारी भेटीसाठी वेळ दिली आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

गेल्या महिन्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्य परीक्षा मंडळाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. बारावीच्या परीक्षा घेतल्या जातील, असेही म्हटले होते. सीबीएसई बोर्डानेसुद्धा दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने याबाबत दाखल याचिकेच्या सुनावणीवेळी राज्य सरकारच्या या निर्णयावर काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यामुळे राज्यात दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत नेमके काय होणार? या संभ्रमात विद्यार्थी आणि पालक आहेत. अशावेळी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली. विद्यार्थ्यांच्या हिताला राज्य सरकारचे प्राधान्य आहे. तिसर्‍या लाटेची आपण चर्चा करत आहोत.

त्याचा सर्वाधिक परिणाम मुलांवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कुटुंबात एखादा करोनाबाधित असेल तर तेथील विद्यार्थ्यांची मानसिकता काय असेल हे समजून घेतले पाहिजे. विद्यार्थ्यांमध्येही संभ्रम आणि भीतीचे वातावरण आहे.वर्षभरापासून मुले परीक्षेची तयारी करीत आहेत. विद्यार्थ्यांचे हित, त्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य पाहूनच त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे शिक्षणमंत्री गायकवाड म्हणाल्या.

न्यायालयासमोर बाजू मांडणार

मुंबई उच्च न्यायालयाने दहावी परीक्षांबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयावरून ताशेरे ओढले होते. त्याबाबतही शिक्षणमंत्री गायकवाड यांनी भूमिका मांडली. उच्च न्यायालयाला आम्ही आमचे म्हणणे सांगू. सध्याची ही असाधारण परिस्थिती आहे. दुसरी लाट कमी असेल असे वाटत होते, पण करोना संसर्ग वाढला आहे. दुसर्‍या लाटेत मुलांवर परिणाम होत आहे. न्यायालयासमोर आमची बाजू मांडणार आहोत. न्यायालय याबाबत सहानुभूतीने विचार करेल, अशी खात्री शिक्षणमंत्र्यांनी व्यक्त केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com