नाशिक | प्रतिनिधी

अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्यातील तापमानात अमुलाग्र बदल झालेला बघायला मिळत आहे. नाशिक शहरात तुरळक पावसाचे थेंब देखील पडण्यास सुरुवात झाली होती. उत्तर महाराष्ट्र पावसाची शक्यता देखील वर्तविण्यात आल्यामुळे बळीराजा धास्तावला आहे.

गेल्या दोन दिवसांपूर्वी नाशिकमधील वातावरण अचानक थंड झाले होते. तपमान जवळपास १० अंशांच्या खाली आले होते. यानंतर अचानक तपमानात दहा अंशांनी वाढ होऊन ढग दाटून आले आहेत.

यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत. अधिकच्या गारठ्यामुळे अनेक भागात द्राक्षांच्या घडांना तडे गेले असतानाच अचानक आता पावसाचे सावट असल्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.

उत्तर महाराष्ट्रातही ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी गारपिटीची शक्यता कुलाबा वेधशाळेने व्यक्त केली आहे. येत्या एक ते दोन दिवसांत ढगाळ वातावरण निवळण्याची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असला तरी वातावरण निवळते तोवर भीती कायम आहे.

दरम्यान आजपासून तीन दिवस उत्तर महाराष्ट्रातल्या धुळे, जळगाव, नाशिक, नंदुरबार जिल्ह्यात मेघगर्जनेसह गारपिटीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. जर या भागात अवकाळी पावसाने हजेर लावली तर इथे कांदा, कांद्याचे रोप यासह फळबागांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.