Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याराज्यातील 3780 जि.प.शिक्षक स्वगृही परतणार

राज्यातील 3780 जि.प.शिक्षक स्वगृही परतणार

नंदुरबार – Nandurbar – प्रतिनिधी :

राज्य शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील 3 हजार 780 जिल्हा परिषद शिक्षकांचा स्वगृही परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाने सन 2020 ची आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया पूर्ण केली असून जिल्हा परिषद स्तरावर शिक्षकांना कार्यमुक्त करण्याबाबतचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती शासनाचे राज्य बदली समन्वयक तथा नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिली.

- Advertisement -

राज्य शासनाच्या 27/02 च्या शासन निर्णयानुसार राज्यातील शिक्षकांच्या बदल्यांबाबत धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने राज्यात दरवर्षी शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्हा अंतर्गत बदलीसाठी ऑनलाईन प्रक्रिया राबविण्यात येते. कोविड विषाणूच्या प्रदूर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शिक्षकांच्या बदल्या होतील किंवा नाही? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, शासनाने शिक्षकांच्या बदल्यांसाठी विशेष समितीची स्थापना करून नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांना बदली समन्वय समितीच्या प्रमुखपदी नियुक्त केले होते. दि.10 ऑगस्टपूर्वी राज्यातील सर्व शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या ऑनलाइन व जिल्हाअंतर्गत बदल्या ऑफलाईन करण्याबाबत समितीला अधिकार देण्यात आले होते. त्यानुसार गेली अनेक वर्षे स्वतःच्या गावापासून व परिवारापासून लांबवर नोकरी करणार्‍या शिक्षकांची सुविधा व्हावी, यादृष्टीने बदली समन्वय समितीने आंतरजिल्हा बदली प्रक्रिया हाती घेऊन राज्यातील तब्बल 3780 शिक्षकांच्या घर वापसीचा मार्ग मोकळा करून दिला.

नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी याबाबत बोलताना सांगितले की, राज्यातील मराठी व उर्दू माध्यमाच्या एकूण 12 हजार 490 शिक्षकांनी स्व जिल्ह्यात बदली करून मिळण्यासाठी शासनाकडे विनंती अर्ज केले आहेत. ऑनलाइन पद्धतीने करण्यात आलेल्या या अर्जांची छाननी करून प्रत्येक जिल्हास्तरावर बिंदुनामावलीनुसार रिक्त असलेल्या जागा, बदलीनंतर 10टक्केपेक्षा जास्त जागा रिक्त राहू नयेत याची काळजी घेऊन , त्यानुसार संवर्गनिहाय बदली इच्छुक शिक्षकांच्या याद्या तयार करून ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या संवर्गातील शिक्षकांना सामावून घेणे शक्य आहे, त्या त्या ठिकाणी संबंधित शिक्षकांच्या बदली अर्जाच्या प्राधान्यक्रमानुसार बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्य शासनाच्या 27/2 च्या शासन निर्णयानुसार या बदल्या करण्यात आल्या असून, या धोरणावर अनेक शिक्षकांनी व शिक्षक संघटनांनी बदल सुचविले आहेत. बदलीबाबतच्या अभ्यास गटाने त्याबाबत शासनाला अहवाल सादर केलेला असून, पुढील बदल्या शासन धोरणात योग्य ते बदल करून केल्या जातील, अशी अपेक्षा आहे. प्रत्येकाला संवर्गनिहाय जागेच्या उपलब्धतेनुसार आपापल्या जिल्ह्यात नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

आज जाहीर झालेल्या बदली यादीनुसार राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये 1890 शिक्षक हे बदलीने जाणार असून, तेवढेच शिक्षक हे परजिल्ह्यातून बदली करून येणार आहेत. जिल्हानिहाय व माध्यमनिहाय बदलीने जाणार्‍या व येणार्‍या शिक्षकांची संख्या पुढील प्रमाणे आहे. त्यात मराठी माध्यमाचे नगर जिल्ह्यातून जाणारे शिक्षक 41 येणारे शिक्षक 62, अकोला जाणारे 29 येणारे 14, अमरावती जाणार 26 येणार 15, औरंगाबाद जाणार 89 येणार 45, भंडारा जाणार 26 येणार 67, बीड जाणार 51 येणार 41, बुलढाणा जाणार 31 येणार 56, चंद्रपूर जाणार 22 येणार 95, धुळे जाणार 46 येणार 72, गडचिरोली जाणार 49 येणार 8, गोंदिया जाणार 20 येणार 32, हिंगोली जाणार 36 येणार 97, जळगाव जाणार 26 येणार 25, जालना जाणार 85 येणार 61, कोल्हापूर जाणार 41 येणार 32, लातूर जाणार 4 येणार 4, नागपूर जाणार 11 येणार 44, नांदेड जाणार 31 येणार 82, नंदुरबार जाणार 99 येणार 125, नाशिक जाणार 83 येणार 87, उस्मानाबाद जाणार 26 येणार 38 पालघर जाणार 11 येणार 24, परभणी जाणार 43 येणार 122, पुणे जाणार 48 येणार 65, रायगड जाणार 247 येणार 18, रत्नागिरी जाणार 324 येणार 6, सांगली जाणार 71 येणार 28, सातारा जाणार 40 येणार 109, सिंधुदुर्ग जाणार 5 येणार 7, सोलापूर जाणार 37 येणार 98, ठाणे जाणार 55 येणार 47, वर्धा जाणारा 8 येणार 31, वाशिम जाणार 7 येणार 7, यवतमाळ जाणार 65 येणार 163 शिक्षक आहेत.

उर्दू माध्यमाचे नगर जिल्हा जाणार 5 येणार 3, अकोला जिल्हा जाणार 2 येणार 14, अमरावती जाणार 7 येणार 4, औरंगाबाद जाणार 8 येणार 8, बीड जाणारे 1 येणारे 0, बुलढाणा जाणार 7 येणार 9, हिंगोली जाणार 1 येणार 1, जळगाव जाणार 5 येणार 5, जालना जाणार 6 येणार 7, कोल्हापूर जाणारे 1 येणार 0, लातूर जाणारे 1 येणारे 1, नाशिक जाणारे 1 येणारे 1, उस्मानाबाद जाणारे 1 येणारे 1, परभणी जाणार 0 येणार 4, सोलापूर जाणार 1 येणार 1, वाशिम जाणारे 1येणारे 1 आणि यवतमाळ जाणार 15 येणार 3 अशाप्रकारे प्रत्येक जिल्ह्यातून जाणार्‍या व येणार्‍या शिक्षकांची संख्या असून, 1890 शिक्षक स्व जिल्ह्यात जाणार असतांनाच तेवढेच शिक्षक आपल्या जिल्ह्यात येणार आहेत.

दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंधरा दिवसांपूर्वी शासनाने शिक्षकांच्या ऑनलाईन व ऑफलाईन बदल्यांबाबत आदेश जारी केले होते. त्या अनुषंगाने अत्यंत पारदर्शक व शीघ्रगतीने बदली प्रक्रिया राबवून बदली अभ्यास गटाचे समन्वयक विनय गौडा यांनी उत्कृष्ट कार्य करून दाखविले असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.

नंदुरबार जिल्ह्यातून 99 शिक्षक परजिल्ह्यात बदली करून जात असून, 125 शिक्षक नंदुरबार जिल्ह्यात बदलीने येत आहेत. नंदुरबार जिल्ह्यातून हिंगोली जिल्ह्यात सर्वाधिक 27 शिक्षकांच्या बदल्या झाल्या असून, यवतमाळ जिल्ह्यात 19, धुळे जिल्ह्यात 13, परभणी जिल्ह्यात 12, जालना जिल्ह्यात 5 तर बुलढाणा, नाशिक व सातारा जिल्ह्यात प्रत्येकी 4, गडचिरोली जिल्ह्यात 2 तर वर्धा, ठाणे, सोलापूर, पालघर, रायगड, जळगाव व चंद्रपूर जिल्ह्यात प्रत्येकी एका शिक्षकाची बदली झाली आहे. तर नंदुरबार जिल्ह्यात रत्नागिरी जिल्ह्यातून सर्वाधिक 47 शिक्षक बदलीने येत असून, रायगड जिल्ह्यातून 20, धुळे जिल्ह्यातून 14, सांगली जिल्ह्यातून 11, नाशिक जिल्ह्यातून 9, औरंगाबाद व कोल्हापूर जिल्ह्यातून प्रत्येकी 5, सातारा व अहमदनगर जिल्ह्यातून प्रत्येकी 3, बीड जिल्ह्यातून 2 तर पालघर, सोलापूर व यवतमाळ जिल्ह्यातून प्रत्येकी एक शिक्षक बदलीने येत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या