
नाशिक । प्रतिनिधी Nashik
राज्यातील वर्ग ‘अ’ आणि ‘ब’ सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम (ज्या टप्प्यावर थांबल्या होत्या तेथून पुढे) 16 डिसेंबर 2022 पर्यंत जाहीर करा, असा आदेश खंडपीठाचे न्या. मंगेश पाटील आणि न्या. वाय. जी. खोब्रागडे यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था निवडणूक प्राधिकरणाला मंगळवारी (दि.14) दिला. यामुळे नाशिक जिल्हा मजूर फेडरेशनच्या संचालक मंडळाचा निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.
रविवारी (दि.25) मतदान तर 26 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असून आज याबाबतचा अधिकृत सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. त्यानुसार सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊन काही टप्पे पार पडले असतानाच राज्यातील काही ग्रामपंचायतींची निवडणूकसुद्धा याच काळात होणार असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे राज्य शासनाने दि.29 नोव्हेंबर 2022 रोजी आदेश जारी करून राज्यातील वर्ग ‘अ’ आणि ‘ब’ सहकारी संस्थांच्या निवडणुकीला 20 डिसेंबर 2022 पर्यंत स्थगिती दिली होती.ती आता उठविण्यात आली आहे.
नाशिक जिल्हा मजूर फेडरेशनची पंचवार्षिक निवडणूकही पुढे ढकलण्यात आल्यामुळे उमेदवारांमध्ये नाराजीचा सूर होता.जिल्हा मजूर फेडरेशनच्या पंचवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर यंदा सर्वाधिक अर्ज आले होते. माघारीच्या अंतिम दिवसापर्यंत इच्छूकांची मनधरणी सुरु होती. अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी 164 उमेदवारांपैकी 128 उमेदवारांनी माघारी घेतली. तसेच आठ संचालक बिनविरोध झाले आहेत. त्यामुळे उर्वरित 12 जागांसाठी 36 उमेदवार रिंगणात आहेत.यामध्ये पाच जागा ह्या जिल्हास्तरावर असल्यामुळे या गटातून उमेदवारी करणार्यांना संपूर्ण जिल्हाभर मतदारांपर्यत प्रचारासाठी फिरावे लागते.
26 डिसेंबरला मतमोजणी
सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार रविवारी (दि.25) येथील क्रांतिवीर व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात मतदान होणार असून 26 डिसेंबर रोजी काशीमाळी मंगल कार्यालय, द्वारका या ठिकाणी मतमोजणी होईल.