तीन कोटी खर्च करूनही नागरिकांना धुळीचा त्रास

स्थानिकांना धुळीचा आणि खड्ड्यांचा त्रास
तीन कोटी खर्च करूनही नागरिकांना धुळीचा त्रास

पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati

पेठरोडवरील (Peth Road) राऊ हॉटेल ते तवली फाटा रस्ता प्रशासकीय कार्यकाळात जवळपास तीन कोटी रुपये खर्च करून दुरूस्त करण्यात आला होता. जून महिन्यात पडलेल्या पहिल्या पावसात या रस्त्याच्या (Road) कामाचा दर्जा कसा आहे हे समजले. सप्टेंबर महिन्यामध्ये शहरात पडलेल्या संततधार पावसामुळे या रस्त्यावर पुन्हा मोठे खड्डे पडल्याने स्थानिक नागरिकांना धुळीचा (Dust) आणि खड्ड्यांचा (Pits) त्रास सहन करावा लागत असून नागरिकांमध्ये (Citizens) नाराजीचा सूर आहे...

नाशिकहून गुजरातकडे (Nashik to Gujarat) पेठ मार्गे जाण्यासाठी हा एकमेव रस्ता असल्याने मोठ्या प्रमाणात लहान मोठ्या वाहनांची वर्दळ सुरु असते. तसेच या भागात महापालिका हद्दीत नवीन वसाहत मोठ्या प्रमाणात विकसित झाली आहे. या भागातील नागरिक दैनंदिन कामानिमित्त आपल्या दुचाकीवरून तर विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी वाहनाने प्रवास करत असतात. गेल्या वर्षी हा रस्ता खड्डेमुक्त व्हावा यासाठी स्थानिक नागरिकांसह सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला जाग आणण्यासाठी तीन ते चार वेळेस जनआंदोलन छेडत रास्तारोको केले होते.

यावेळी काही आंदोलकांवर पोलिसांत गुन्हे देखील दाखल करण्यात आले होते. रास्तारोको आंदोलनानंतर आंदोलक आणि महापालिकेचे शहर अभियंता यांच्यात पोलिसांच्या उपस्थितीत महापालिका मुख्यालयात बैठक पार पडली होती. त्यानंतर महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून रस्ते दुरुस्तीसाठी तीन कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. सदर कामासाठी ज्या ठेकेदाराला काम दिले होते, त्या ठेकेदाराने सहा ते आठ महिन्यांपूर्वीच रस्त्यावरील खड्डे बुजवत काम पूर्ण केले होते.

मात्र, सप्टेंबर महिन्यात शहरात पडलेल्या संततधार पावसामुळे तयार करण्यात आलेल्या रस्त्यावर नवीन तर जून महिन्यात बुजवले खड्डे पुन्हा एकदा दिसू लागले. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले असून वाहन चालक खड्डे वाचवत आपले वाहन चालवत आहे. खड्डे चुकविण्याच्या नादात अनेकदा अपघात घडत आहे. दरवेळी पावसामुळे जर असे बुजवलेले खड्डे पुन्हा दिसत असतील तर ठेकेदाराने कशा पद्धतीचे काम केले याची चौकशी करत ठेकेदारावर तसेच महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर महापालिका आयुक्तांनी कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

लोकप्रतिनिधींना तसेच महापालिकेच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तक्रार केली असता लवकरच रस्त्याचे कॉंक्रीटीकरण केले जाणार असल्याचे उत्तर मिळते. तोपर्यंत हा त्रास जनतेने का सहन करावा. ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम केले असून अधिकारी पाठीशी घालत आहे. अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर कारवाई व्हावी हीच मागणी.

तुषार देशमुख, स्थानिक रहिवासी

आमच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी छोटेसे दुकान सुरू केले आहे. परंतु, रस्त्यावरील धुळीमुळे दुकानात विक्रीसाठी आणलेल्या मालावर धुळीचे थर जमा होत आहे. त्यामुळे वस्तू घ्यायला येणारे ग्राहक मालावरील धुळ बघून परत निघून जातात. दुकानात बसतांना दिवसभर तोंडाला रूमाल बांधून बसावे लागते आहे. याकडे महापालिका आयुक्तांनी लक्ष घालावे. मंगला

राजू राथड, व्यावसायिक

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com