Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याआनंदी वातावरणात ख्रिसमसला सुरुवात

आनंदी वातावरणात ख्रिसमसला सुरुवात

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाताळच्या पूर्वसंध्येला मध्यरात्री चर्चमध्ये प्रार्थना करून अतिशय आनंदी वातावरणात ख्रिसमस सणास( Christmas Festival-2022) प्रारंभ झाला.

- Advertisement -

नाशिक, नाशिकरोड, देवळालीत चर्चमध्ये मोठी गर्दी होती. सर्वच चर्चच्या बाहेर येशू जन्माचे आकर्षक देखावे करण्यात आले आहेत. चर्चच्या वतीने ख्रिसमस गीतांचे गायन करण्यात आले.

चर्चमध्ये ख्रिसमसच्या आदल्या रात्री ख्रिसमस इव्ह साजरी केली. यामध्ये येशू जन्माची कहाणी, सर्वधर्मसमभाव, सर्वत्र समानता, मानवधर्म, मानवता, देवावर विश्वास ठेवून सेवा, क्षमा आणि शांततेचा संदेश देण्यात आला. रात्री नऊला होलीक्रॉस चर्चमध्ये प्रभू येशू जन्माचा सोहळा रंंगला. साडेनऊला द्विभाषिक मिस्सा झाला.

नाशिकचे होलीक्रॉस चर्च, शरणपूररोडचे संंत आंद्रीया चर्च, भद्रकालीतील चर्च, नाशिकरोड येथील जुने भाजीमार्केट परिसरातील संत फिलिप्स चर्च, जेलरोडचे संत आंद्रिया चर्च, उपनगरचे बाल येशू मंदिर, देवळाली कॅम्प येथील सेंट पॅट्रिक चर्च येथे ख्रिश्चन बांधवांनी पवित्र मिस्सा (प्रार्थना) अर्पण करत एकमेकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी लहान मुलांनी डोक्यात लाल टोप्या परिधान केल्या होत्या. तर सर्व चर्चवर रोषणाई करण्यात आली आहे.

न्यू इरा स्कूलमध्ये नाताळ

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी न्यू इरा शाळेत नाताळ सण साजरा करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ख्रिसमस ट्रीला तारा, भेटवस्तू, फुगे यांनी सजवण्यात आले होते. नाटिका, कोडे सोडवा, गाणी, जाहिरात, एकपात्री प्रयोग आणि केबीसी यांसारख्या कार्यक्रमांचे शिक्षकांनी प्रस्तुतीकरण केले. जिंगलबेलच्या तालावर सांताक्लॉजच्या हस्ते मुलांना चॉकलेटस् वाटण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या