
दिल्ली | Delhi
चीनमध्ये करोनाचा प्रचंड प्रकोप वााढला आहे. त्यामुळे चीनमधील करोना रुग्णांची संख्या दिवसे न् दिवस वाढत आहे. चीनमध्ये उडालेल्या या हाहाकारामुळे भारत सरकार अलर्ट झालं आहे. देशातील सर्वच राज्यांना अलर्ट राहण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत. तसेच आता आतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नवी नियमावली केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे.
परदेशांतून भारतात येणाऱ्या विमान प्रवाशांपैकी दोन टक्के प्रवाशांच्या करोना चाचण्या होतील याची दक्षता घ्या, अशी सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाला गुरुवारी केली. २४ डिसेंबरपासून यादृच्छिक पद्धतीने (रँडम) या चाचण्या होतील. चाचण्या केल्यानंतर प्रवाशांना विमानतळावरून जाण्याची मुभा असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रवास करण्याच्या ७२ तासांआधी प्रवासांनी आरटी-पीसीआर चाचणीचा अहवाल. तसंच, चीन आणि अन्य देशातून येणाऱ्या प्रवाशांना लसीकरण प्रमाणपत्राची माहिती देण्यासाठी एअर सुविधा फॉर्म पुन्हा लागू करण्याचा विचार आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत देण्यात आली आहे.
नेजल व्हॅक्सिनलाही मान्यता
भारत सरकारने जगातील पहिल्या नेजल व्हॅक्सिनला मान्यता दिली आहे. भारत बायोटेकची नाकातून दिली जाणारी ही लस बूस्टर डोस म्हणून वापरली जाईल. ही लस सर्वप्रथम खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून दिली जाईल. माहितीनुसार, आजपासूनच याचा करोना लसीकरण कार्यक्रमात समावेश करण्यात आला आहे. याआधी कॉर्बावॅक्सला बूस्टर डोस म्हणून देण्याची परवानगी देण्यात आली आहे.
दरम्यान भारतामध्ये ओमायक्रॉनच्या BF.7 या सबव्हेरियंटचे चार रुग्ण सापडले आहेत. सध्या याच व्हेरियंटने जगभरात थैमान घातलं आहे. देशात गेल्या 24 तासांत 163 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहे. भारतातील एकूण सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या चार हजारांहून कमी आहे. सध्या देशात 3,380 कोरोना रुग्ण उपचाराधीन आहेत.