
भेंडाळी | वार्ताहर | Bhendali
येथे सुरू असलेला बालविवाह निनावी कॉलमुळे रोखण्यात सायखेडा पोलिसांसह ग्रामस्थांना यश आले आहे. वय पूर्ण झाल्यानंतरच सप्तपदी करण्याचे लेखी घेण्यात आले आहे.
आज काळ बदलला, शिक्षणामुळे नागरिक जागरूक झाले, मुलींच्या शिक्षणालाही तेवढेच प्राधान्य दिले जात आहे. समाजातील हे सकारात्मक चित्र असले तरी आजही अनेक कुटुंबात मुलींना आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवटच सोडावे लागत आहे. त्यातून बालविवाहासारख्या घटना घडत आहे.
बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार लग्नासाठी मुलीचे वय १८ आणि मुलाचे वय २१ वर्षे असणे बंधनकारक असून तरीही बालविवाह होत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. गुरुवारी (दि. १०) निफाड तालुक्यातील भेंडाळी येथे होत असलेला बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे.
सायखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत यापूर्वीही तीन बालविवाह रोखण्यात पोलीस प्रशासनाला यश आले आहे. दरम्यान, जिल्हा बाल संरक्षण समितीच्या मार्गदर्शनाखाली भेंडाळी येथे अल्पवयीन मुलीचा सुरू असलेला बालविवाह रोखण्यात आला.
उजनी (ता. सिन्नर) येथील अल्पवयीन मुलीचा विवाह जऊळके (ता. दिंडोरी) येथील मुलासोबत होत असल्याचा निनावी कॉल जागरूक नागरिकाकडून नाशिक जिल्हा चाईल्ड लाईनच्या समन्वयकांना प्राप्त झाला.
त्यानुसार तत्काळ हळदीचा कार्यक्रम सुरू असताना सायखेड्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. वाय. कादरी, भेंडाळी येथील ग्रामसेवक पी. एस. निपुंगळे, पोलीस पाटील संघटनेचे अरुण बोडके, स्थानिक पोलीस पाटील संजय चाबुकस्वार, सरपंच संजय खालकर, पोलीस नाईक मोठाभाऊ जाधव, पोलीस नाईक प्रकाश वाकळे आदींनी संबंधित ठिकाणी जात मुलीच्या आई-वडिलांना मुलीचा विवाह तिचे वय १८ पूर्ण झाल्यावरच करण्याची सक्त ताकीद दिली. तसेच, भविष्यात अशा पद्धतीचे कृत्य केले जाणार नसल्याचे बंधपत्रही मुलीच्या कुटुंबीयांकडून लिहून घेण्यात आले.
जागरुक व संवेदनशील नागरिकांनी गावात बालविवाह होत असल्यास स्थानिक पोलीस, पोलीस अधिक्षक कार्यालय अथवा चाईल्ड हेल्पलाईन नंबर -१०९८ अथवा डायल-११२ वर माहिती द्यावी. जेणेकरून बालविवाह रोखण्यास मदत होईल.
- पी.वाय. कादरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक, सायखेडा