सरकार बरखास्त करुन महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावा; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी

उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे

मुंबई | Mumbai

मागील काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या गोळीबार, हल्ला प्रकरणावरून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यावर आज शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'मातोश्री' येथे पत्रकार परिषद घेत भाष्य करत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. तसेच राज्य सरकार तात्काळ बरखास्त करावे अशीही मागणी उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली...

ते म्हणाले की, देशात लवकरात लवकर निवडणुका घेण्यात याव्यात. तसेच सर्वोच्च न्यायालयाला माझी जाहीर विनंती आहे. ते आमची शेवटची आशा आहेत. हे सरकार घटनाबाह्य आहे हे सांगून आम्हाला न्याय द्यावा. सरकारचा कारभारावर वचक राहिला नाही. सर्वोच्च न्यायालयाने सरकारला झापले आहे, पण त्यांच्यावर काही परिणाम होत नाही. त्यामुळे न्यायालयाने लवकरात लवकर निर्णय द्यावा आणि लोकशाही वाचवावी. जनता आज उद्विग्न अवस्थेत आहे. त्यामुळे न्यायालयाकडून अपेक्षा आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, "गेले काही दिवस महाराष्ट्रामध्ये उद्विग्न अस्वस्थता आहे. डोळ्यासमोर जी काही बेबंधशाही सुरू आहे. महाराष्ट्र काय आहे हे माहीत नसलेले निर्ढावलेले पणे बोलत आहेत. पण महाराष्ट्रातील लोकांची मन दुखावली आहेत, गुंडांचा हैदोस महाराष्ट्रामध्ये सुरू आहे.सरकारमध्ये गँगवार सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी अभिषेक घोसाळकरांची हत्या झाली. त्यानंतर या गुंडाने स्वतः आत्महत्या का केली? फेसबुक लाईव्हमध्ये गोळ्या घातल्या, पण गोळ्या कोण घालतंय हे त्यात दिसत नाही. बॉडिगार्डच्या बंदुकीने त्याने गोळ्या घातल्या असे सांगितले जाते आहे, पण त्या मॉरिसला बॉडीगार्ड का ठेवावा लागला? त्या दोघांची सुपारी कोणी दिली होती का?" असा गंभीर प्रश्नही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

राज्याला मनोरुग्ण गृहमंत्री लाभले आहेत

यावेळी उद्धव ठाकरेंनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांची मानसिक स्थिती स्थिर नाही, राज्याला मनोरुग्ण गृहमंत्री लाभले आहेत. गाडीखाली श्वान आला तरी राजीनामा मागतील असे फडणवीस बोलले. श्वान हा संस्कृत शब्द बोलल्याने सुसंस्कृत होत नाही. त्यामुळे निर्ढावलेला निर्दय मनाचा हा गृहमंत्री आहे. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो आणि तुम्ही त्यांची तुलना श्वानाशी करता? असे म्हणत ठाकरेंनी फडणवीसांवर हल्लाबोल केला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com