मुख्यमंत्री नितीशकुमारच!

मोदी, फडणवीस यांचा निर्वाळा
मुख्यमंत्री नितीशकुमारच!

पाटणा ।वृत्तसंस्था

बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने 125 जागा जिंकून बहुमत मिळवले आहे. जदयूपेक्षा जास्त जागा जिंकूनसुद्धा निवडणुकीआधी दिलेल्या शब्दांवर भाजप नेते ठाम राहिल्याने नितीशकुमार पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत.

नितीशकुमार हेच एनडीए सरकारचे मुख्यमंत्री होतील, असा निर्वाळा भाजपचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार मोदी यांनी दिला आहे. भाजपचे बिहार निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनीही मोदी यांच्याच सूरात सूर मिसळत नितीशकुमार यांच्या मुख्यमंत्रीपदावर शिक्कामोर्तब केले आहे.

सत्ताधारी एनडीएने मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहार विधानसभा निवडणूक लढवली. दोन्ही पक्षांनी यंदा समसमान जागांवर उमेदवार उभे केले होते. मात्र ताज्या निकालानुसार भाजप 74 जागा जिंकून राज्यातील दुसरा मोठा पक्ष ठरला आहे.

नितीश कुमार मुख्यमंत्री होतील यात कुठलाही संभ्रम नाही. कारण आमचे हे वचन होते, असे सुशीलकुमार मोदी यांनी म्हटले आहे. निवडणुकांमध्ये कमी-अधिक यश मिळत असते. एकत्रितपणे निवडणूक लढवताना एखादा पक्ष अधिक जागा जिंकतो तर दुसरा कमी जागा जिंकतो. तथापि आम्ही समान भागीदार आहोत, असेही मोदी यांनी सांगितले.

भाजप शब्दाला पक्का!

दिलेला शब्द भाजप पाळतो. त्यामुळे दिलेल्या शब्दाप्रमाणे नितीशकुमार हेच बिहारचे मुख्यमंत्री होतील, असे सांगताना भाजपचे बिहार निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर निशाणा साधला. बिहार निवडणुकीतून खूप शिकायला मिळाले. एका राज्याची निवडणूक हाताळण्याची मोठी जबाबदारी प्रथमच पक्षाने सोपवली होती. आगदी सुरुवातीपासून ते तिकीट वाटप तसेच प्रचारापर्यंत मी सहभागी होतो. पंतप्रधानांच्या सभांपर्यंत तेथे हजर होतो. अखेरच्या टप्प्यात मात्र हजर राहता आले नाही, असेही फडणवीस म्हणाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com