मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या मुख्य नेतेपदी निवड

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या मुख्य नेतेपदी निवड

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिले आहे. त्यानंतर प्रथमच शिंदे गटाने अधिकृत शिवसेना पक्ष कार्यकारिणीची बैठक घेतली. या बैठकीत एकनाथ शिंदे यांची शिवसेना पक्षप्रमुखपदी नव्हे तर पक्षाच्या मुख्य नेतेपदी निवड झाली आहे. या निवडीमुळे शिवसेना पक्षाचे सर्वाधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असणार आहेत. जसे याआधी शिवसेनेमध्ये पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे होते.

बैठकीत शिंदे यांची निवड पक्षप्रमुख म्हणून होते का, अशी चर्चा होती. मात्र शिंदे शिवसेनेच्या मुख्य नेतेपदी कायम आहेत.तर रामदाम कदम यांचे पुत्र सिद्धेश रामदास कदम यांची शिवसेना सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

पक्षाकडून एक समिती स्थापन करण्यात येणार आहे. पक्षाविरोधात काम करणार्‍या पदाधिकार्‍यांना बडतर्फ करण्याचे अधिकार या समितीकडे असणार आहेत. या समितीत दादा भुसे, शंभुराजे देसाई, संजय मोरे यांचा समावेश आहे. याबरोबरच कार्यकारिणीच्या बैठकीत काही निर्णय देखील घेण्यात आले. याबाबत शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, यावेळी अनेक ठराव संमत झाले.

तसेच निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमावलीनुसारच सर्व निर्णय झाल्याचे ते म्हणाले. घटनेला अनुसरूनच एकनाथ शिंदे यांनी कार्यकारणीला संबोधित केले आहे. तसेच कोणाच्याही संपत्तीवर आणि अकाऊंटवर मालमत्तेवर आमचा अधिकार दाखवणार नाही. आम्ही बाळासाहेबांचा विचार घेऊन पुढें चालल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केल्याचे सामंत यांनी सांगितले.

महत्त्वाचे निर्णय

1) चर्चगेट रेल्वेस्टेशनला माजी केंद्रीय मंत्री चिंतामणराव देशमुख यांचे नाव देणे

2) राज्यातील भूमिपुत्रांना नोकर्‍यांमध्ये 80 टक्के स्थान देणे.

3) मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणार.

4) स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देणे.

5) यूपीएससी आणि एमपीएससीच्या मराठी मुलांना भक्कम पाठिंबा देणे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com