
नाशिक | Nashik
केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) शिवसेना (Shivsena) हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) गटाला दिले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यातच आता राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मोठे विधान केले आहे.
यावेळी भुजबळ म्हणाले की, माझ्या माहितीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे, सुभाष देसाई अशी काही नावे पुढे केली होती. अगदी सुरुवातीला एकनाथ शिंदे यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी सुचविण्यात आले होते. पंरतु, सिनियर म्हणून ठाकरे यांना गळ घालण्यात आली. शिवाय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) तसा आग्रह केला. म्हणून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदी बसवण्यात आल्याचे भुजबळांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले की, खरी शिवसेना कुठली आहे हे जनता ठरवेल. त्यासाठी निवडणुका (Elections) आवश्यक आहेत. समाजमाध्यमांमुळे निशाणी आणि नावं सर्वदूर जातं. शेवटी संघटनेचा प्रमुख कोण आहे, हेच लोक लक्षात घेतात. त्यामुळे आता जनता ठरवेल कुणाला ठेवायचं आणि कुणाला नेस्तनाबुत करायचं? असा इशाराही यावेळी भुजबळांनी दिला.
तसेच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपने शिंदे गटाला नाव व चिन्ह मिळवून देण्यासाठी २००० कोटींचा सौदा केल्याचा आरोप केला होता. त्यावर बोलताना भुजबळ म्हणाले की, यावर मला काही जास्त सांगता येणार नाही. पण शिवसेनेतून फुटून ज्यावेळी एकनाथ शिंदे आणि बाकी लोक फुटले. या घटनेची स्क्रिप्ट दिल्लीतून (Delhi) तयार झाली आहे. त्यांच्याकडे अशाप्रकारचे व्यवस्थापन कौशल्य असल्याने या गोष्टी घडून आल्या आहेत. यावर महाराष्ट्रातील जनता काय म्हणते, हे बघावे लागेल, असे भुजबळांनी सांगितले.