रुसवे फुगवे बाजूला ठेऊन कामे करा; भुजबळांची राज्य सरकारवर टीका

रुसवे फुगवे बाजूला ठेऊन कामे करा; भुजबळांची राज्य सरकारवर टीका

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

राज्यात शिंदे सरकार (Shinde Government) स्थापन होताच त्यांनी नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) ६०० कोटी रुपयांच्या जनहिताच्या कामांना स्थगिती दिली. त्यांनंतर राज्यातील सर्व जिल्हा नियोजनच्या कामांना स्थगिती दिली...

गेल्या दीड वर्षाच्या कालावधीत महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi Government) मंजूर केलेल्या विविध विकासकामांनादेखील या सरकारने स्थगिती देण्याचा दुर्दैवी निर्णय घेतला. मात्र आम्ही गप्प बसणार नाही अधिवेशनात याबाबत आवाज उठविण्यात येईल असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले.

ग्रामपंचायत कार्यालय शास्त्रीनगर लोणारवाडी ता.सिन्नर येथे विविध छगन भुजबळ यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी आमदार माणिकराव कोकाटे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, नारायण वाजे, पंढरपूर संस्थांचे विश्वस्त एकनाथ महाराज गोळेसर, उदय सांगळे, डॉ.विष्णू अत्रे, राजाराम मुरकुटे, राजेंद्र जगझाप, विलास दराडे, डॉ.संदीप लोंढे,सरपंच डॉ.सदाशिव लोणारे, उपसरपंच भामाबाई लोणारे, माजी सरपंच राजेंद्र भगत, कैलास झगडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी आमदार छगन भुजबळ म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत राज्यात ३०.७७ लाख शेतकऱ्यांना १९,६४४ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले. तसेच राज्यात दोन लाखाहून अधिक कर्ज असणाऱ्या नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये मदत देण्याचा निर्णय शासनाने घेण्यात आला.

राज्यातील २ लाख गरजू व गोरगरीब जनतेला १० रुपयात जेवण देण्याचा निर्णय शिवभोजन थाळी योजनेच्या माध्यमातून घेण्यात आला. कोरोनाच्या काळात नागरिकांना मोफत स्वरुपात शिवभोजनचे वाटप करण्यात आले.५४ हजार रेशन दुकानांच्या माध्यमातून ९ लाख टन धान्याचे वाटप करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, करोनाच्या (Corona) कालावधीत नाशिक जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांचे (Civil Hospital) बळकटीकरण करण्यात आले. जिल्ह्यात सर्व शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा विकसित करण्यात आली. त्यामुळे ऑक्सिजन निर्मितीत नाशिक जिल्हा स्वयंपूर्ण बनला असून जिल्ह्यात आता ७०० मेट्रिक टनहून अधिक ऑक्सिजन निर्मिती करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

राज्यात नैसर्गिक संकट, अतिवृष्टी यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. राज्यात १३० हून अधिक नागरिकांचा पुरात वाहून मृत्यू झाला आहे. राज्यात अद्यापही काही ठिकाणी अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आलेले नाही. शेतकऱ्यांना मोठ्या मदतीची अपेक्षा आहे. राज्यात मंत्री मंडळाचा विस्तार झाला. मात्र रुसवे फुगवे सुरू आहे हे रुसवे फुगवे बाजूला ठेऊन काम करावी, अशी टीका त्यांनी यावेळी केली. यावेळी आमदार माणिकराव कोकाटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या विकास कामांचे झाले भुमिपूजन व लोकार्पण

जनसुविधा व मुलभूत सुविधा योजनेअंतर्गत दशक्रिया विधी शेड महिलांसाठी बैठक व्यवस्था व स्नानगृह, १५ व्या वित्त आयोग व आमदार खासदार निधीतून गावांअंतर्गत रस्ते कॉंक्रीटीकरण, महात्मा फुले सांस्कृतिक स्टेज व महात्मा फुले पुतळा व समता चौक सुशोभिकरण, ठक्कर बाप्पा योजनेच्या माध्यमातून आदिवासी वस्ती पाणी पुरवठा योजना, १५ व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून भूमिगत गटार, यात्रा स्थळ योजनेतून यात्रेकरुंसाठी सार्वजनिक स्वच्छता गृह, १५ व्या वित्त आयोगातून शुद्ध पाण्यासाठी आरओ प्लांट,लोणारवाडी ते वडगाव सिन्नर रस्ता डांबरीकरण, दशक्रिया विधी रस्ता खडीकरण या कामांचे लोकार्पण करण्यात आले.

तसेच जलजीवन मिशन अंतर्गत सप्तशृंगीनगर व जामखोल वस्तीसाठी पाणी पुरवठा योजना, १५ व्या वित्त आयोगातून २४/७ पाणी पुरवठ्यासाठी प्रत्येक नळास वॉटर मीटर बसविणे,आमदार निधी अंतर्गत रस्ते कॉंक्रीटीकरण,१५ व्या वित्त आयोगातून भूमिगत गटार या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com