करोनाची धास्ती : पाहा, उत्तर महाराष्ट्रात कुठे शाळा सुरु राहणार? कुठे बंद

करोनाची धास्ती : पाहा, उत्तर महाराष्ट्रात कुठे शाळा सुरु राहणार? कुठे  बंद

मुंबई - पुण्यातल्या शाळा बंद राहणार असल्याचे शनिवारीच स्पष्ट झाले. परंतु राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये सोमवारपासून (23 नोव्हेंबर) शाळा सुरू होणार आहेत. राज्य सरकारने शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय स्थानिक प्रशासनावर सोडला आहे. उत्तर महाराष्ट्रात कुठे शाळा सुरु राहणार? कुठे बंद राहणार आहे ते पाहू या..

जळगावात ७ डिसेंबरपर्यंत नाहीच

जळगाव जिल्ह्यातील सर्व शाळा, आश्रमशाळा, वसतिगृह ७ डिसेंबर २०२० पर्यंत सुरू न करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत. जळगाव जिल्ह्यातील सद्दयस्थिती बघता कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत असून दिवाळी सणाच्या कालावधीनंतर मोठ्या प्रमाणात जळगाव जिल्ह्यात नागरिकांची ये-जा वाढली होती. तसेच शाळा सुरु करण्याबाबत शालेय व्यवस्थापन समिती व पालक संघाकडून प्राप्त झालेले अभिप्रायनंतर ७ डिसेंबर २०२० पर्यंत शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नाशिकमध्ये ४ जानेवारीपर्यंत बंदचा निर्णय

नाशिक जिल्ह्यातील सर्व शाळा ०४ जानेवारी पर्यंत बंद राहणार आहेत. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी माहिती दिली आहे.यावेळी पालकमंत्री भुजबळ म्हणाले की जगातील अनेक देशात पुनश्च करोना साथ पसरत आहे. दिवाळीपूर्वी नाशिक जिल्ह्यात लक्षणीय सुधार जाणवत होता. मात्र,दिवाळीनंतर पुन्हा प्रादुर्भाव सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ४ जानेवारीपर्यंत परिस्थिती पाहून त्यानंतर शाळा सुरु कराव्यात का याचा निर्णय होणार आहे.

नंदुरबारमध्ये शाळा उघडणार

नंदुरबार जिल्ह्यात शाळा सुरु करण्याची तयारी पुर्ण झाली आहे. आठ महिन्यानंतर सोमवारी (ता. २३) रोजी शाळेची घंटा वाजणार आहे. दरम्यान जिल्ह्यातील १२०० शिक्षकांची करोना चाचणी झाली. त्यातील २० शिक्षक करोना पॉझिटिव्ह आले.

धुळ्यात शाळा सुरु होणार

धुळे जिल्ह्यात शाळा सुरु करण्याची तयारी पुर्ण झाली आहे. धुळ्यात आठ महिन्यानंतर सोमवारी (ता. २३) रोजी शाळेची घंटा वाजणार आहे. शाळेचा परिसर व वर्ग खोल्या याआधीच निर्जंतूक करण्यात आल्या आहेत.

अहमदनगरमध्ये शाळेची घंटा वाजणार

अहमदनगर जिल्ह्यात शाळा सुरु राहणार आहे. शाळा सुरु करण्याची तयारी पुर्ण केली आहे. परंतु अनेक पालकांनी हमीपत्र देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे शाळा सुरु झाली तरी किती विद्यार्थी शाळेत येतील? हा प्रश्नच आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com