
भुसावळ Bhusaval। प्रतिनिधी
सुमारे दोन वर्षापूर्वी रावेर तालुक्यातील बोरखेडा या लहानश्या गावात मध्यरात्री कुर्हाडीने चार बालकांची निर्घृण हत्या (Brutal killing of children)केल्याची थरारक घटना घडली होती. यातील आरोपी सध्या जिल्हा कारागृहात असून दोषारोप पत्र दाखल (Chargesheet filed) झाल्याने आज भुसावळ येथे विशेष सत्र न्यायाधीश आर.एम. जाधव यांच्यासमोर हजर केले. विशेष सरकारी वकिल उज्वल निकम यांनी यावेळी सरकार पक्षाची बाजू मांडली.
याबाबत माहिती अशी की, बोरखेडा, ता.रावेर येथे 16 ऑक्टोबर 2020 रोजी मध्यरात्री चार अल्पवयीन मुलांचा कुर्हाडीने वार करून खुन केल्याची थरकाप उडविणारी घटना घडली होती. सदर कुटूंब हे आपल्या मुलांना शेतातील घरात ठेवून नातेवाईकाच्या तेरवीच्या कार्यक्रमास गेले होते. ही मुल घरात एकटीच होती.
याचा गैरफायदा घेवून संशयीत आरोपी महेंद्र सिताराम बारेला (वय 22) याने यातील एका मुलीवर दारूच्या नशेत अत्याचार केला. यावेळी त्या मुलीच्या भावास जाग आली. आपला अपराध उघड होवू नये म्हणून या माथेफिरूने एक-एक करून चारही भावंडांची हत्या केली होती. या प्रकरणी रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा रजि. क्र.18/20 प्रमाणे नोंद करून भा.दं.वि. 302, 376 (अ), 452, 201 व पोस्को चे कलम 4, 6, 8, 10 व 12 नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. फिर्यादी शेत मालक मुस्तफा यासीन हे आहेत.
या खटल्यात दोषारोप पत्र दाखल असून विशेष सत्र न्यायाधीश आर.एम. जाधव यांच्या समोर या खटल्याच्या कामकाजाचा आराखडा ठरून 13, 14 व 15 मार्च रोजी सलग काम चालविले जाणार असल्याचे सांगण्यात आले. पुढील सुनावणी होण्यापुर्वी 294 च्या अर्जावर से मांडावे असेही संगण्यात आले.
सदरच्या गंभीर खटल्यात विशेष सरकारी वकिल उज्वल निकम हे स्वतः हजर होते. त्यांना सरकरी वकिल मोहन देशपांडे, सुरेंद्र काबरा, अॅड.विजय खडसे, अॅड.एस.डी. सोनवणे व अॅड. पी.बी. भोंबे यांनी सहकार्य केले. आरोपीच्या वतीने भुसावळचे अॅड. सत्यनारायण पाल यांनी काम पाहिले. यावेळी न्यायालयाच्या आवारात गर्दी जमा झाली होती.