बंद कारखान्यांना वीज वितरणचा शॉक

फिक्स डिमांड चार्जेससह 15 टक्के वाढला भार
बंद कारखान्यांना वीज वितरणचा शॉक
USER

सातपूर । रवींद्र केडिया

मागील वर्षीच्या कडक लॉकडाऊननंतर उद्योजक स्थिरावण्याचा प्रयत्न करत असतानाच उद्योगांवर पुन्हा एकदा लॉकडाऊन लागला. यात कामगारांंचा भार व इतर खर्चाचा ताण असतानाच वीज वितरण कंपनीचा 15 टक्क्यांंचा वेगळा भार उद्योजकांच्या माथी पडत असल्याने उद्योजकांपुढे आता कर्जबाजारी होण्याशिवाय पर्याय नसल्याची चर्चा उद्योगक्षेत्रात आहे.

औद्योगिक क्षेत्रात हाय टेन्शन व लो टेन्शन अशा दोन प्रकारात विद्युत पुरवठा दिला जातो. यातही उद्योगांना अत्यावश्यक असणार्‍या विजेचा भार अगोदर नोंदवून त्याबाबत डिमांड कॉन्ट्रॅक्ट करावा लागतो. यामुळे, वीज वितरण कंपनीलाही औद्योगिक मागणीची जाणीव असते.

मात्र मागील वर्षी शासनाने कडक लॉकडाऊन लावले होते. पहिल्या वेळी लॉकडाऊन अचानक लागल्याने लोक अज्ञान होते, त्यामुळे याकडे फारसे लक्ष दिले गेले नाही. दुसर्‍या वेळी पुन्हा बंदझाल्यानंतर काही अंशाने उद्योग सुरू असताना विजेची मागणी अत्यल्प होती. मात्र डिमांड कॉन्ट्रॅक्ट नुसार विज बिल भरणे उद्योगांना बंधनकारक झालेले असल्याने वीज वापर न करता भुर्दंड भरावा लागत असल्याची तक्रार उद्योजक करीत आहेत.

शासनाने एकीकडे बंदचे निर्देश दिले. सामाजिक हित लक्षात घेऊन उद्योजकांनी आपले उद्योग बंद ठेवले. मात्र, वीज वितरण कंपनीचे पोषण करण्यासाठी उद्योजकांना भार सोसत राहावा लागत असल्याने अशा खर्चातून नजीकच्या काळात निश्चितच उद्योजक कर्जबाजारी होण्याकडे झुकणार आहेत अशी भीती व्यक्त केली जात आहे.

वीज वितरण कंपनीकडे विजेबाबतच्या सर्व यंत्रणा उपलब्ध आहेत. उद्योगांनी किती भाराची नोंद केली आहे, त्यांनी किती वीज वापरलेली आहे, या सर्व नोंदी असताना न वापरलेल्या विजेच्या बिलाची मागणी अन्यायकारक असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. उद्योग सुरळीतपणे कार्यरत राहिले असते, तर डिमांड कॉन्ट्रॅक्ट बाबत फारशी तक्रार कोणाची नव्हती. मात्र, सद्यपरिस्थितीत उद्योग बंद असल्याने विज वापरण्याची गरज नसताना अनावश्यक भार उद्योगांना सोसावा लागत असल्याने उद्योजक नाराजी व्यक्त करीत आहेत.

लॉकडाऊन शासनाने लावलेला असताना शासनाच्याच उपशाखा म्हणून असणार्‍या वीज वितरण कंपनीने आठ ते दहा महिन्यापूर्वी वीज नियामक मंडळाकडून मान्य करून घेतलेल्या दरवाढीचा भार या लॉक डाऊनमध्ये उद्योजकांवर टाकल्याने उद्योजक त्रस्त झाले आहेत. विजेचा वापर करण्यासाठी उत्पादन क्षेत्रात 25 टक्के कामगार उपस्थित आहेत. मात्र वीज बिल पूर्वीच्या बिला प्रमाणेच येत असल्याने उद्योजक आश्चर्यचकित झाले आहेत.

वीज दरात 15 टक्के छुपी वाढ

वीज वितरण कंपनीने वीज दराच्या आकारणीमध्ये केडब्ल्यूएच ऐवजी केव्हिएच केल्याने ग्राहकांना मिळणारा 4 टक्क्यांचा परतावा बंद झाला. पूर्वी कॉन्ट्रॅक्ट डिमांड दर 4.11होता, तो आता 5 टक्के वाढून आता 4.32 झाला आहे. पुढल्या वर्षी एक एप्रिलपासून हे दर 4.54 होणार आहेत. मात्र वीजदर एक टक्क्याने कमी केला आहे.पूर्वी कॉन्ट्रॅक्ट डिमांडवर मफिक्स चार्ज म वीज वापराच्या 50 टक्के होता. तो आता 60 टक्के करण्यात आला आहे. येथे दहा टक्केे वाढ झाली.म्हणजेच वीज ग्राहकांना वीज दरात एक टक्का सवलत देऊन 15 टक्के अतिरिक्त भार लावलेला आहे. ही दरवाढ अशा वातावरणात केलेली आहे जेव्हा उद्योग बंद आहेत. विजेचा वापर नसताना अकारण लाखो रुपयांचा भुर्दंड ग्राहकांना बसत आहे. राज्य शासनाने व वीज नियामक मंडळाने तातडीने कॉन्ट्रॅक्ट डिमांड चार्जेस रद्द करून वापरलेल्या वीज बिलावरच आकारणी करावी, अशी मागणी लघु उद्योग क्षेत्रातून केली जात आहे.

शासनाने ठरवले तर याबाबत योग्य तो निर्णय होणे शक्य आहे. धोरणात्मक निर्णयाची यासाठी गरज आहे. प्रत्येक उद्योजक यासाठी भांडू शकत नाही. लॉकडाउन काळापुरती कॉन्ट्रॅक्ट डिमांड कमी करणे अडचणीचे ठरत आहे. लॉकडाऊन काळात न वापरलेल्या बिलाची मागणी करु नये यासाठी शासनाने निर्णय घेणे गरजेचे आहे.

मिलिंद चिंचोलीकर, ऊर्जा विशेषज्ञ व उद्योजक

लॉकडाउन काळात उद्योग मोठ्या प्रमाणात बंद आहेत. यातील पन्नास टक्के उद्योजक कारखाने सुरू करणार आहेत, मात्र उत्पादन प्रक्रिया ही 30 ते 40 टक्केच्या वर गेली नाही, त्यामुळे आपोआपच विजेची मागणी घटलेली आहे. पूर्ण क्षमतेने उद्योग सुरू होतील तेव्हा लागणारी वीज गृहीत धरून बिल आकारणी करणे जाचक आहे.

व्यंकटेश मूर्ती, उद्योजक

वीज वितरण कंपनीतर्फे आकारला जाणारा कॉन्ट्रॅक्ट डिमांड, लॉकडाऊन काळात फार अवघड होत आहे. कॉन्ट्रॅक्ट डिमांड कमी करून घेण्यासाठी कालावधी ज्ञात नसल्याने उद्योजकही संभ्रमावस्थेत आहेत. सर्व व्यवहार सुरळीत होईपर्यंत वाट पाहण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे उद्योजकांना वास्तविक येणार्‍या बिलाच्या प्रमाणे वीज आकारणी करावी अन्यथा कर्जबाजारी होण्याची शक्यता आहे.

मिलिंद राजपूत, ऊर्जा उपसमिती, महाराष्ट्र चेंबर

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com