Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकचणकापूर उजव्या कालव्याला गळती

चणकापूर उजव्या कालव्याला गळती

भऊर । वार्ताहर

चणकापूर उजव्या कालव्याला वरवंडी शिवारात मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने कालव्यालगत असलेल्या शेतकऱ्याचे नऊ एकर शेतातील उभ्या पिकावर पाणी फिरल्याने अंदाजे….

- Advertisement -

(सर्व छायाचित्रे : बाबा पवार, देशदूत भऊर)

२५ ते ३० लाखांचे नुकसान झाले असून संबंधित शेतकऱ्याने अनेकवेळा याबाबत संबंधित कालव्याच्या कार्यालयात हेलपाटे मारूनही कोणतीही कार्यवाही न झाल्याची संतप्त प्रतिक्रिया नुकसानग्रस्त शेतकऱ्याने व्यक्त केली आहे.

चणकापूर उजव्या कालव्यालागत भऊर फाट्याजवळ वरवंडी शिवारात विशाल रावण आहेर यांची नऊ एकर शेती आहे. सध्यस्थितीत सदर नऊ एकरात एक एकर टमाटे, दीड एकर डाळिंब ( ४०० झाडे ), दोन एकर मका व दहा गुंढे मध्ये कांद्याचे रोप लावले आहे व उर्वरित जमीन कांदा लागवडीसाठी मशागत करून तयार केली आहे.

चणकापूर उजव्या कालव्याला चणकापूर धरणातून पूरपाणी सोडण्यात आले असून कालव्याची वहनक्षमता लक्षात घेता नेहमीच पाण्याच्या गळतीचे प्रकार पाहावयास मिळतात. मात्र, एन पावसाळ्यात जागे झालेल्या पाटबंधारे विभागाला पाण्याची गळती थांबविण्यास कधीही यश आलेले नाही.

याची प्रचिती १९९९ पासून कालव्यालगत असलेल्या शेतकऱ्यांना आलेली आहे. अशीच काहीशी परिस्थिती नुकसानग्रस्त शेतकरी विशाल आहेर यांच्या शेताची असून चणकापूर उजव्या कालव्याद्वारे आपली व परिसरातील शेतकऱ्यांची जमीन ओलिताखाली येईल म्हणून त्यांनी १९९९ पासून पाण्याच्या गळतीचा अन्याय सहन केला आहे.

याबाबत संबंधित शेतकऱ्याने चणकापूर उजव्या कालव्याच्या देवळा येथील कडवा प्रकल्प कार्यालयात अनेकवेळा गळतीबाबत लेखी तक्रार करून कोणतीही कार्यवाही अद्याप झालेली नाही त्यामुळे दरवर्षी संबंधित शेतकरी गळतीच्या ठिकाणाहून चारी काढून शेतालगत असलेल्या नाल्याला स्वखर्चाने पाणी टाकून देत होते.

मात्र, दोन वर्षांपूर्वी त्यांच्या शेतालगत कालवा फुटण्याची शक्यता निर्माण झाल्याने पाटबंधारे विभागाने तेवढ्याच ठिकाणी स्लॅब टाकला होता.

तेव्हापासून विशाल आहेर यांच्या शेतात गळतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याने चारी काढूनही मोठ्या प्रमाणात पाणी संपूर्ण शेतात घुसले असले काढणीला आलेल्या मका पिकासह टमाटे व डाळिंब तसेच कांद्याच्या रोपाचे शंभर टक्के नुकसान झाले असून आजच्या बाजारभावाप्रमाणे २५ ते ३० लाख रुपयाचे नुकसान झाल्याची माहिती विशाल आहेर यांनी दिली.

आमच्या शेतालगत असलेल्या डोंगराला लागून चणकापूर उजवा कालवा जात असून कालव्याला जेव्हापासून पाणी सोडण्यात आले तेव्हापासून आमच्या शेतात कालव्याची गळती चालू आहे.

आम्ही याबाबत संबंधित विभागाच्या कार्यालयात अनेकवेळा लेखी तक्रार करूनही कोणतीही कार्यवाही झालेली नाही.दोन वर्षांपासून पावसाळी पिकावर पाणी फिरले आहे. यावर्षी टमाटे, डाळिंब, कांदा, मक्याला चांगला भाव मिळत असताना संपूर्ण नऊ एकर शेतात पूर्णतः पाणी साचल्याने सर्व पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले.

विशाल रावण आहेर, नुकसानग्रस्त शेतकरी

चणकापूर उजव्या कालव्याच्या गळतीबाबत प्रत्यक्ष पाहणी करून लवकरात लवकर गळती थांबविण्यासाठी प्रयत्न केले जातील.

एस. एल. चौधरी, कनिष्ठ अभियंता, चणकापूर उजवा कळवा

- Advertisment -

ताज्या बातम्या